
> मंगेश मोरे
मुंबईत पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात काहींनी शिवसेनेशी गद्दारी केली. मात्र, त्याचा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर कोणताही परिणाम झाला नसून पालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 73 मधून शिवसेनेच्या लोना रावत विजयी झाल्या. स्थानिक शिवसेना आमदार बाळा नर यांनी या विजयाबद्दल मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आहेत.
खालील लिंकवर क्लिक करा आणि वाचा अपडेट्स…
जोगेश्वरीतील मतदारांनी शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राखला आहे. जोगेश्वरी गद्दारांच्या पाठीशी कधीही उभी राहणार नाही हा स्पष्ट संदेश जोगेश्वरीकरांनी दिला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार बाळा नर यांनी दिली. आपल्या विधानसभा मतदारसंघातील इतर प्रभागांमध्ये देखील शिवसेनेची मशालच धगधगणार, असा विश्वास बाळा नर यांनी व्यक्त केला आहे.
अंधेरी पूर्वेकडील गुंदवली शाळा मतमोजणी केंद्रामध्ये जोगेश्वरीतील प्रभागांची मतमोजणी सुरू आहे. सध्या वॉर्ड क्रमांक 72 ची मतमोजणी सुरू असून तेथे शिवसेनेच्या मनीषा मनोहर पांचाळ भाजपच्या ममता पंकज यादव यांना जोरदार टक्कर देत आहेत.
वॉर्ड क्रमांक 77 मध्येही शिवसेनेचे वर्चस्व असून येथून शिवसेना-मनसे राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या शिवानी शैलेश परब यांनी निवडणूक लढवली आहे. या प्रभागातून शिवानी परब यांचा विजय निश्चित मानला जात आहे.





























































