
>> विशाल फुटाणे
मध्ययुगीन भारतात राजा व प्रजेप्रति असलेल्या कर्तव्यभावनेतून प्राणार्पणाला महत्त्व प्राप्त झाले. युद्धावरून परतल्यानंतर आनंदाच्या भरात स्वतचा प्राण अर्पण केले जाई, ज्याला ‘वीरमरण’ मानले जाई. नवकंडम आणि अरिकंडम या पद्धती याच मानसिकतेचे टोकाचे रूप होते.
इतिहासाकडे पाहताना आपण अनेकदा भूतकाळातील घटनांना आजच्या मूल्यांच्या मोजपट्टीने मोजतो. त्यामुळे काही प्रथा क्रूर, अमानवी किंवा अंधश्रद्धेच्या वाटतात. मात्र प्राचीन काळातील समाजमानस समजून घेतल्याशिवाय त्या प्रथा का जन्माला आल्या, का टिकल्या आणि शेवटी का लुप्त झाल्या हे उमगत नाही. सततची युद्धे, अस्थिर सत्ता, धर्माचा खोलवर प्रभाव आणि मरणाला प्रतिष्ठा देणारी मानसिकता या सर्वांचा संगम म्हणजे नवकंडम, अरिकंडम आणि आत्मबलिदानाची संस्कृती.
प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात युद्ध हे अपवादात्मक नव्हते, तर ते जीवनाचाच भाग होते. एका राजाचे राज्य टिकवण्यासाठी शेजारील राज्यांशी संघर्ष अटळ होता. सीमारेषा स्थिर नव्हत्या, सत्तांतर सतत घडत होते. अशा वातावरणात राजा म्हणजे केवळ प्रशासक नव्हे, तर तो प्रजेचा पालक, रक्षक आणि अनेकदा देवाचा प्रतिनिधी मानला जात असे. विशेषत दक्षिण भारतातील तामीळ साहित्याने राजाला दैवी स्वरूप दिले. राजराजा चोलाला विष्णूचा अवतार मानले गेले, तर कुलोत्तुंग चोलाच्या जन्मालाच दैवी अधिष्ठान लाभले. अशा राजाचे जीवन सुरक्षित राहणे हे प्रजेचे व सैनिकांचे परम कर्तव्य समजले जाई.
या कर्तव्य भावनेतूनच प्राणार्पणाला महत्त्व प्राप्त झाले. युद्धात राजा जिवंत परतला तरी आनंदाच्या भरात स्वतचा प्राण अर्पण करणारे लोक होते. ही आत्महत्या नसून ‘वीरमरण’ मानले जाई. नवकंडम आणि अरिकंडम या पद्धती या मानसिकतेचे टोकाचे रूप होते. स्वतचे नऊ भाग करून मृत्यू स्वीकारणे किंवा एका वारात स्वतला संपवणे या कृती आज भयावह वाटतात, पण त्या काळी त्या धैर्य, निष्ठा आणि श्रद्धेचे प्रतीक होत्या.
या बलिदानांना समाजमान्यता होती, एवढेच नव्हे तर स्मरणार्थ शिल्पे उभारली जात. तामीळनाडूपासून आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रापर्यंत अशा स्मारकांची परंपरा दिसते. कन्नड भाषेतील ‘वीरगळ’ हा शब्द मराठीत रूढ झाला. हे वीरगळ केवळ युद्धात शत्रूला मारताना मरण पावलेल्या योद्धय़ांचे नव्हते, तर कर्तव्यभावनेतून आत्मबलिदान करणाऱयांचेही होते. काही ठिकाणी त्यावर शिलालेख कोरलेले असून त्या काळातील समाजमनाचे दर्शन घडते.
राजाच्या संरक्षणासाठी असलेले विशेष सैनिक दल या मानसिकतेचे मूर्त स्वरूप होते. चोल राजांसाठी वेलक्कर, पांडय़ांसाठी तेन्नावन यांसारख्या अंगरक्षक तुकडय़ा होत्या. या सैनिकांनी देवीसमोर शपथ घेतलेली असे की, राजाच्या जिवाला धोका झाला आणि तो त्यांच्या निष्काळजीपणामुळे मरण पावला, तर ते स्वतचे मस्तक छेदून आत्मबलिदान देतील. ही शपथ भीतीपोटी नव्हे, तर सन्मान टिकवण्यासाठी होती. पराभव आणि अपमान यापेक्षा मृत्यू श्रेष्ठ मानला जात असे.
या सर्व प्रक्रियेत धर्मसत्ता सर्वोच्च होती. राजा बलवान असला तरी तो देवतेपुढे नम्र असे. म्हणूनच अनेक राजघराण्यांनी लेणी, मंदिरे, देवस्थानांच्या विस्तारासाठी मोठे योगदान दिले. अजंठा, वेरूळ, बदामीची लेणी किंवा रामेश्वरम मंदिराचा विस्तार हा केवळ भक्तीचा नव्हे, तर राजसत्तेवर देवसत्तेचे अधिष्ठान मान्य केल्याचा पुरावा होता. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीसमोर करंगळी अर्पण करण्याची प्रथा याच श्रद्धेचा भाग होती. राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्षाने इ.स. 871 मध्ये प्रजेच्या रक्षणासाठी करंगळी अर्पण केली, याचा उल्लेख शिलालेखात आढळतो. अहिंसेचा समर्थक आणि जैन धर्माचा अनुयायी राजा अशी कृती करतो, यावरून त्या काळातील तांत्रिक प्रभाव किती खोलवर रुजलेला होता हे स्पष्ट होते.
मात्र समाज एका जागी थांबत नाही. सततच्या युद्धांनी आणि रक्तपाताने समाज थकला. मृत्यूला दिलेले अतिरेकी महत्त्व प्रश्नांकित होऊ लागले. मध्ययुगीन काळात मुघल सम्राट अकबराने पराभूत राजांना जीवदान देण्याचे धोरण स्वीकारले, हा केवळ राजकीय निर्णय नव्हता, तर मानसिकतेतील मोठा बदल होता. ‘मरण हाच सन्मान’ या विचाराऐवजी ‘जगून सुधारणा’ हा विचार रुजू लागला. वीरगळांच्या स्वरूपातही हा बदल दिसून येतो. महाराष्ट्र आणि विशेषत सोलापूर जिह्यातील वीरगळांमध्ये आत्मबलिदान निदर्शक वीरगळ अत्यल्प प्रमाणात आढळतात. बलिदान आणि आत्मबलिदान यातील फरक समाजाने ओळखायला सुरुवात केली होती.
सोलापूर जिह्यातील सिद्धापूर येथील आत्मबलिदान निदर्शक वीरगळ, तसेच अलीकडे कासेगाव व अरळी येथे सापडलेली शिल्पे या संक्रमणकाळाची साक्ष देतात. त्या दगडावर कोरलेला वीर एकांतात शांतपणे स्वतचे मस्तक छेदताना दाखवला आहे. कोणतीही मिरवणूक नाही, कोणताही गजर नाही. ही शांतता समाजाच्या अंतर्मुखतेचे प्रतीक आहे.
इतिहास हा केवळ राजे, युद्धे आणि तारखा यांचा संग्रह नसतो. तो मानवी मनाचा दीर्घ प्रवास असतो. नवकंडम आणि अरिकंडमसारख्या प्रथा आपल्याला त्या काळातील कठोर वास्तव दाखवतात, तर त्यातून बाहेर पडत समाजाने स्वीकारलेली करुणा, अहिंसा आणि विवेक ही मानवी प्रगतीची खरी चिन्हे आहेत. म्हणूनच वीरगळ हे केवळ दगड नाहीत, ते माणसाच्या मानसिक परिवर्तनाचे मौन साक्षीदार आहेत.
(लेखक इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)



























































