ऐकावे जनांचे… – हिंदीची समृद्ध खिडकी

>>अक्षय मोटेगावकर

हिंदी भाषेतील समृद्ध साहित्यसंपदेचा आस्वाद घेण्यासाठी ऐकावे असे डॉ. कुमार विश्वास यांचे त्यांच्याच नावाने असणारे यूटय़ूब चॅनेल म्हणजे हिंदी भाषेतील संपन्नतेचा अनुभव घेण्यासारखे आहे.

व्हायरल हा शब्द जेव्हा फक्त इन्फेक्शनबाबतच वापरला जायचा त्या काळात म्हणजे 2006-07 च्या काळात हा माणूस यूटय़ूबच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला होता. 2005 ला यूटय़ूब आले आणि 2006-07 च्या आयआयटी मुंबईच्या एका कार्यक्रमात या माणसाने एक कविता म्हटली आणि ती कविता अक्षरश तरुणाईच्या ओठांवरचे गाणे झाले. सोपे शब्द, सोपी पण ठेका धरायला लावणारी चाल, गाणं सादर करावं तशी कविता हा माणूस सादर करतो आणि सहजगत्या तरुणाईच्या भावनांना साद घालतो.

डॉ. कुमार विश्वास म्हणजेच डॉ. विश्वास कुमार शर्मा या माणसाने अभियांत्रिकीला प्रवेश मिळाल्यावर त्यात रुची निर्माण होत नाहीये म्हणून हिंदी साहित्याचा अभ्यास करायचे ठरवले आणि हिंदीचे प्राध्यापक झाले. हिंदी साहित्यात विद्यावाचस्पतीही झाले. खुल्या दिलाने प्रेम केले.

आंतरजातीय विवाह केला. घरी सगळे उच्चपदस्थ अधिकारी, इंजिनीअर, शास्त्रज्ञ आणि कुलगुरू वगैरे असताना विश्वासने मात्र आपले हिंदी साहित्यावरील प्रेम जोपासले आणि त्याच्याच जोरावर देशोदेशी डंका वाजवला. उत्तर प्रदेशातील पिलखुवा या छोटय़ाशा गावातील विश्वासने आपल्या कवितांनी आणि हिंदीप्रेमाने भारतातच नाही, तर जगभरात हिंदी साहित्याचा मोठय़ा प्रमाणात प्रसार केला.

यूटय़ूबच्या कविता सादरीकरणाच्या काही व्हिडीओज्नंतर ओळख झाली ती डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘कुमार विश्वास’ या यूटय़ूब चॅनेलची. डॉ. कुमार विश्वास यांच्या अभ्यासाचा आवाका लक्षात आला. हिंदी कविता, गझल, साहित्य, अध्यात्म, राजकारण अशा अनेक क्षेत्रात लीलया मुशाफिरी करणारे डॉ. कुमार विश्वास खरे भावले ते त्यांच्या काव्य-गझल प्रेमातून आणि अध्यात्माकडे त्यांनी पाहिलेल्या वेगळ्या दृष्टीतून. ‘कोई दिवाना कहता है, कोई पागल समझता है’ यापासून ओळख झाली, पण डॉ. कुमार विश्वासांकडे मी खरा आकर्षिला गेलो ते त्यांनी सादर केलेल्या ‘तर्पण’ या शृंखलेमुळे. ही संकल्पना फार आवडली. तर्पण म्हणजे काय तर देव, ऋषी आणि पूर्वज यांना पाणी, तीळ आणि दर्भ (पवित्र गवत) अर्पण करून त्यांना तृप्त करणे. तर्पण नित्यकर्म म्हणून पण केले जाते आणि श्राद्ध, पितृपक्ष किंवा तिथीला पण केले जाते. नित्यकर्माचे तर्पण म्हणजे ब्रह्मयज्ञ करीत देव, ऋषी आणि पूर्वज यांना तिलांजली देणे.

डॉ. कुमार विश्वासांनी या व्हिडीओ शृंखलेमध्ये हिंदी साहित्यातील थोर महारथी जसे की, बाबा नागार्जुन, हरिवंशराय बच्चन, जयशंकर प्रसाद, दुष्यंत कुमार, महाकवी रामधारी सिंग दिनकर, सूर्यकांत त्रिपाठी निराला, भवानी प्रसाद मिश्र, महादेवी वर्मा, अज्ञेय यांसारख्या थोर प्रभृतींना आदरांजली वाहिली आहे. त्यापैकी दिनकर, दुष्यंत कुमार, बाबा नागार्जुन, जयशंकर प्रसाद यांच्याबाबतचे व्हिडीओज् हे माझ्या आवडीचे आहेत. मराठी ही आपली माय आहे तर हिंदी मावशी, त्यामुळे हिंदी साहित्यात ज्यांना रुची असेल किंबहुना हिंदी भाषेतील अत्यंत समृद्ध साहित्यसंपदेचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे चॅनेल जरूर ऐकावे. डॉ. कुमार विश्वास फक्त साहित्यिकाच्या जीवनाबद्दल, लेखनाबद्दल सांगत नाहीत, तर त्यातील मर्मस्थळे आणि सौंदर्यस्थाने उलगडून सांगतात. त्यांच्या साहित्यातील राजकीय आणि सामाजिक जाणिवांचा मागोवा घेतात. कधी कधी वैश्विक साहित्यातील तौलनिक अभ्यास पण मांडतात. राष्ट्रकवी दिनकर आणि दुष्यंत कुमारांच्या कविता आणि लिखाणाबद्दल बोलताना त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेल्या राजकीय टीकेचाही यथोचित सन्मान केला आहे. ज्या ज्या वेळी समाजात विखार वाढतो त्या त्या वेळी साहित्यिकांना कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे हेच त्यांनी यातून अधोरेखित केले आहे.

डॉ. कुमार विश्वासांबाबत अप्रूप वाटावी अशी गोष्ट म्हणजे, डॉ. विश्वास हे एकपाठी आहेत. एकदा वाचलेली किंवा ऐकलेली कविता, गझल त्यांना लगेच पाठ होते. जुन्या, नव्या सगळ्या कविता मुखोद्गत असणे ही साहित्यिकाच्या दृष्टीने फार जमेची बाजू असते याचा प्रत्यय त्यांचे व्हिडीओज् ऐकताना वारंवार येतो. डॉ. कुमार साहित्य अभ्यासाबाबत प्रचंड समृद्ध आहेत. त्यांचे ‘अपने अपने राम’, ‘अपने अपने श्याम’ या व्हिडीओ शृंखला अप्रतिम आहेत. ‘पद्मिनी आणि गोरा बादल’ यांच्यावरचा व्हिडीओ तर अंगावर रोमांच आणतो. त्यांच्या चॅनेलवर सनातन धर्म आणि त्याची डोळस चिकित्सा यावर खूप काही ऐकण्यासारखे आहे. ‘स्वर्ण स्वर भारत’ या शृंखलेतील कथा आणि इतर प्रेरणादायी व्हिडीओही तितकेच रोचक आहेत. डॉ. कुमार विश्वास म्हणजे हिंदी भाषेची समृद्ध खिडकी आहेत.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)

[email protected]