देवदर्शनासाठी जायचे म्हणून नेले आणि दमदाटी करून पुण्यात मतदान करून घेतले; गेवराईच्या बचतगटांच्या महिलांची फसवणूक

ऐन संक्रांतीच्या धावपळीत बचत गटाची मिटिंग आहे आणि देवदर्शनही करायचे आहे. असे सांगून गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील भोळ्याभाबड्या महिलांना जेजुरीत घेऊन गेले. मतदानाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड भागात घेऊन जात त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना मतदान करायला लावले. देवदर्शन न करता गावाकडे आणून सोडले. संतापलेल्या महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि रितसर तक्रार दिली.

गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील शेतमजूर असणार्‍या बचत गटाच्या महिलांना देवदर्शनासाठी जायचे आहे म्हणून गाडीत बसवले. दुसर्‍या दिवशी म्हणजे १५ तारखेला पुण्यात बैठक आहे. त्या बैठकीलाही जायचे आहे असे सांगितले गेले. जेजुरीत एक दिवस आधी मुक्कामाला ठेवले. देवदर्शन झालेच नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर पिंपरी-चिंचवडमध्ये नेण्यात आले आणि दबाव टाकून घड्याला मतदान करायला लावले. मतदान झाल्यानंतर थेट गावाकडे आणून सोडले. खोटे बोलून मतदानासाठी नेल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दिली.