222 प्रवासी, हजारो फुटांवर विमान अन् बॉम्बची धमकी; वॉशरुममधील चिठ्ठीमुळे प्रवाशांची तंतरली, लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. विमान हजारो फुटांवर असताना वॉशरुममध्ये सापडलेल्या चिठ्ठीमध्ये विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिलेले होते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमान तातडीने लखनौकडे वळवण्यात आले आणि तिथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. रविवारी सकाळी हा प्रकार घडल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

इंडिगो एअरलाईन्सचे इंडिगो फ्लाईट 6E-6650 या विमानाने दिल्लीहून उड्डाण घेतले होते. हे विमान पश्चिम बंगालधील बागडोगराच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. या विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती एअर ट्राफिक कंट्रोलला सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी मिळाली. त्यानंतर हे विमान लखनौच्या दिशेने वळवण्यात आले आणि 9 वाजून 17 मिनिटांनी विमानाचे लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

विमान लँड झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने ‘आयसोलेशन बे’मध्ये नेण्यात आले. प्राथमिक तपासात विमानातील मागील स्वच्छतागृहात टिश्यू पेपरवर हाताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. यावर ‘विमानामध्ये बॉम्ब आहे’, असे लिहिलेले होते. याच विमानामध्ये कर्करोगावरील अति महत्त्वाची औषधेही होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी’ स्थापन करण्यात आली आहे. ‘क्विक रिॲक्शन टीम’ने विमानाला घेराव घातला असून, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपासणी सुरू आहे. हा सर्व प्रकार घडला तेव्हा विमानामध्ये 222 प्रवासी, 2 पायलट आणि 5 क्रू मेंबर होते. प्रवाशांमध्ये 8 लहान मुलेही होती. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, याबाबत इंडिगोनेही एक निवेदन जारी केले आहे. 18 जानेवारी 2026 दिल्लीहून बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगो फ्लाईट 6E-6650 मध्ये सुरक्षा धोका लक्षात आल्याने विमान लखनौकडे वळवण्यात आले. प्रस्थापित नियमांनुसार आम्ही तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली असून सुरक्षा तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे इंडिगोने निवेदनात म्हटले.

इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड, सीईओंना तंबी; गैरव्यवस्थापनावरून डीजीसीएची मोठी कारवाई