Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; लष्कराचा परिसराला घेराव

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंगपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून त्या भागात जैश ए मोहम्मदचे दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सिंहपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे परिसरात घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि गोळीबाराला सुरुवात केली. अद्यापही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.

परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित असण्याची शक्यता आहे. दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तसेच परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत आणि आजूबाजूच्या भागात दक्षता वाढविण्यात आली आहे. स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुरक्षा दलाची मोहिम सुरू आहे.