
ग्रेअट नोएडातील सेक्टर 150 मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युवराज मेहता असे मृताचे नाव आहे. युवराजची भरधाव कार रस्त्यावरील नाल्याची भिंत तोडून निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याने भरलेल्या बेसमेंटमध्ये कोसळली. त्याला वेळीच बाहेर पडता आले नाही आणि कुणाची मदतही मिळाली नाही, यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. युवराज मेहता त्याच्या वडिलांसोबत ग्रेटर नोएडातील सेक्टर 150 मधील हाय-राईज सोसायटीमध्ये राहत होता आणि गुरुग्राममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. रात्रीच्या सुमारास धुके जास्त असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नाल्यावरील कठडा तोडून निर्माणाधीन इमारतीच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात कोसळली.
अपघातानंतर युवराजने आपल्या वडिलांना फोनही केला होता. माझ्या मुलाने मला फोन केला होता. पप्पा मी अडकलो आहे. कार नाल्यात पडली आहे. मी बुडतोय, मला मरायचे नाही, हे त्याचे शेवटचे शब्द होते असे युवराजचे वडील राज कुमार मेहता यांनी भरल्या डोळ्यांनी सांगितले. मुलाच्या फोननंतर त्यांनी घटनास्थळी धावही घेतली. मात्र घटनास्थळी पोहोचूनही वेळेत मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप राज कुमार मेहता यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. परंतु तिथे एकही स्वीमर नसल्याने ते युवराजपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तिथे एखादा स्वीमर असता तर कदाचि माझ्या मुलाचे प्राण वाचले असते. यावेळी युवराजच्या मित्रांनीही बचाव पथकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बचाव पथक पहाटे अडीचच्या सुमारास आहे. पण साडे तीन वाजेपर्यंत कुणीही पाण्यात उतरले नव्हते, असा आरोप त्याच्या मित्रांनी केला. तसेच एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पीडित तरुण सुमारे एक-दोन तास कारमध्ये अडकलेला होता. तो मदतीसाठी ओरडत होता, परंतु पाणी खोल असल्याने त्याच्यापर्यंत कुणी पोहोचू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज ग्रँड विटारा कार चालवत होता आणि एका वळणावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार नाल्याची भिंत तोडून निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याने भरलेल्या बेसमेंटमध्ये कोसळली. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पहाटे पाच वाजेपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेनंतर युवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.




























































