बड्या कंपन्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात का येत नाही? रोहित पवार यांचा सवाल

अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणुकीसाठी दावोसच्या दौऱ्यावर जात आहेत. तरीही राज्यात बड्या कंपन्या गुंतवणुकीसाठी का येत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवाजमा घेऊन दावोसला जात आहे. गेल्यावेळी ते दावोसला गेल्यावर मोठी गुंतवणूक आणि अनेक कंपन्या राज्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण राज्यात कोणतीही कंपनी किंवा गुंतवणीक महाराष्ट्रात आली नाही. रोहित पवार यांनी आता त्यावरूनच मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे की, Disney ही मनोरंजन क्षेत्रातील तर Honeywell ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानांतील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी बंगळुरु मधील बेलंदुर ची निवड केलीय. Disney ने बेलंदुर इथे 1,74,000 Sqft जागा भाड्याने घेण्याचा करार केलाय तर honeywell ने तब्बल 4,00,000 Sqft चं ऑफिस सात वर्षांसाठी घेतलंय. त्याचबरोबर Deloitte ने देखील मंगलुरु मध्ये येऊन तब्बल 50,000 लोकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. maruti suzuki तब्बल 35000 कोटी गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवा प्लांट उभारत आहे. मुंबई पर्यायाने महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन असताना व राज्यात बेरोजगारी वाढत असताना या कंपन्या आपल्याकडं ही गुंतवणूक का करत नाहीत, असा एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोस दौऱ्यावर जात आहेत. या दोघांनी शर्थीचे प्रयत्न करून जागतिक दर्जाच्या अशा नामांकित कंपन्यातून राज्यात जास्ती जास्त गुंतवणूक आणून राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा ही, अपेक्षा!, अशी अपेक्षाही त्यांनी सरकारकडे व्यक्त केली आहे.