
आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज अहमदाबादमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, २०२७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल होणार असून, आम आदमी पक्ष हा बदल घडवून आणेल.
केजरीवाल म्हणाले, “गुजरातमध्ये गेल्या ३० वर्षांपासून भाजपचे शासन आहे. या काळात राज्याला खड्ड्यात ढकलण्यात आलं आहे. राज्यात सर्वत्र भय आणि भ्रष्टाचार पसरलेला आहे. आवाज उठवणाऱ्यांना धमकावले जाते, अन्यायाविरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते. भाजप उघडपणे भ्रष्टाचार करते आणि त्याच्याविरोधात कोणीही बोलू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “गुजरातची जनता आता ३० वर्षांच्या भ्रष्टाचाराने कंटाळली आहे आणि बदलाची तीव्र इच्छा बाळगून आहे. जनता बदलासाठी पूर्णपणे तयार आहे. आम आदमी पक्ष गुजरातमध्ये बदल घडवेल आणि भ्रष्टाचारमुक्त शासन आणेल.”




























































