‘Border 2’ चा बॉक्स ऑफिसवर धमाका! ४ दिवसांत १६० कोटींचा टप्पा पार; प्रजासत्ताक दिनी किती कमाई?

border 2 box office collection day 4 (1)

सनी देओल आणि वरुण धवन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉर्डर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसांतच या सिनेमाने १६० कोटी रुपयांचा टप्पा आरामात ओलांडला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केल्याने चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. Sacnilk.com च्या आकडेवारीनुसार, सोमवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्रपटाने १६७.४८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी (शुक्रवार) ३० कोटी रुपयांनी खाते उघडले. शनिवारी कमाईत २१.६७ टक्क्यांची वाढ होऊन ३६.५ कोटी जमा झाले. रविवारी चित्रपटाने ५४.५ कोटींची विक्रमी कमाई केली. सोमवारी (प्रजासत्ताक दिन) सुट्टीचा फायदा मिळाल्याने संध्याकाळपर्यंत ४६.४८ कोटींची कमाई झाली आहे.

प्रमुख शहरांमधील स्थिती:

चेन्नई: सर्वाधिक ८४.५% ऑक्युपन्सी.

मुंबई: १,००० पेक्षा जास्त शोजमध्ये ६०% ऑक्युपन्सी.

जयपूर आणि दिल्ली (NCR): ७७% ऑक्युपन्सीसह चांगली कामगिरी.

पुणे आणि लखनऊ: अनुक्रमे ६७.५% आणि ७०% ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली.

अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘बॉर्डर २’ हा १९९७ च्या आयकॉनिक ‘बॉर्डर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. १९७१ च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात हिंदुस्थानी लष्कर, वायुसेना आणि नौदलाचे शौर्य मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. यात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.