पंचलाइन – स्त्री अनुभवाचे कथन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अक्षय शेलार, [email protected]

स्त्री-अनुभवांची निर्भीड व अस्वस्थ करणारी जाणीव स्टँड-अप कॉमेडियन अली वाँगच्या मांडणीत दिसते. स्त्री संघर्ष उघडपणे कथन करणारा तिचा विनोद स्पष्ट आणि तितकीच अपरिहार्य वाटतो.

अली वाँगचं स्टँड-अप हे आधुनिक कॉमेडीमध्ये स्त्री-अनुभवाच्या उघड, निर्भीड आणि अनेकदा अस्वस्थ करणाऱ्या मांडणीचं द्योतक मानलं जातं. तिचं काम हे कधीही केवळ विनोदापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते शरीर, सत्ता, लैंगिकता, विवाहसंस्था, मातृत्व आणि महत्त्वाकांक्षा या साऱ्यातील संघर्षांचं उघड कथन असतं. वाँग ही केवळ विनोदी कॉमेडियन नसून ती स्वतःचं शरीर, स्वतःची कहाणी आणि स्वतःची अस्वस्थता हे सारं स्टेजवर आणून त्यातून एक सखोल मांडणी करते.

‘बेबी कोब्रा’ (2016) आणि ‘हार्ड नॉक वाईफ’ (2018) या दोन नेटफ्लिक्स स्पेशल्समधून अली वाँग जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली. विशेषत ‘बेबी कोब्रा’मधील तिची गर्भवती अवस्थेतील कामगिरी ही केवळ एक दृश्यात्मक गिमिक नव्हती, तर एक राजकीय विधान होते. स्टेजवर उभी असलेली, गर्भवती, घामाघूम, निर्भीड स्त्री ही स्वतःच पुरुषप्रधान स्टँड-अप परंपरेला दिलेलं थेट आव्हान होतं. वाँगने स्वतःच्या शरीराला लपवण्याऐवजी त्यालाच विनोदाचं, तिच्या एकूण कामाचं केंद्र बनवलं आणि त्यातून स्त्रीच्या इच्छांवर, रागावर आणि महत्त्वाकांक्षांवर थेट मांडणी केली.

वाँगची भाषा कडवट, उग्र आहे. पण त्यातले लैंगिक अन्वयार्थ, क्वचित जाणवणारी अश्लीलता सहज उत्तेजक नाही. तिची भाषा म्हणजे स्त्री-देहाभोवती समाजाने उभ्या केलेल्या लज्जेच्या भिंती फोडण्याचं साधन आहे. पुरुष कॉमेडियन जेव्हा सेक्सबद्दल बोलतात, तेव्हा ते बहुतेक वेळा ‘कूल’ किंवा ‘नॉर्मल’ वाटतं. मात्र वाँग जेव्हा त्याच थेटपणाने स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल बोलते, तेव्हा ती सामाजिक अस्वस्थता उघडी पाडते. तिचा विनोद या अस्वस्थतेवरच बोट ठेवतो. ती हसवते, पण त्यात एक प्रकारची सामाजिक-राजकीय अस्वस्थता बरोबर चिमटीत पकडलेली असते.

अली वाँगचं स्टेजवरील व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाकांक्षी, कडवट आणि स्वतःच्या इच्छांबद्दल निर्भीड असं आहे. ती लग्न, प्रेम आणि मातृत्वाकडे कधीही पारंपरिक आदर्शाच्या नजरेने पाहत नाही. ‘हार्ड नॉक वाईफ’मध्ये ती लग्नाला एखाद्या आर्थिक करारासारखं मांडते. असा करार, अशी व्यवस्था जिथे प्रेमाइतकंच महत्त्व पैसा, सुरक्षितता आणि व्यवहाराला आहे. या दृष्टिकोनामुळे अनेकांना तिची कॉमेडी ‘निराशावादी’ वाटते, पण प्रत्यक्षात ती स्त्रीच्या आयुष्याभोवतीचे रोमँटिक भ्रम फोडण्याचं काम करते.

वाँगचा विनोद अनेकदा आत्मकेंद्रित वाटू शकतो, पण त्या आत्मकेंद्रिततेतूनच ती एक मोठं सामाजिक चित्र उभं करते. आशियाई-अमेरिकन स्त्री म्हणून तिचं स्थान, तिच्या कुटुंबाच्या स्थलांतराची कथा आणि अमेरिकन समाजातील वर्णभेद यांचा तिच्या स्टँड-अपमध्ये सूक्ष्म, पण ठळक संदर्भ असतो. मात्र ती स्वतःला कधीही ‘पीडित’ म्हणून सादर करत नाही. उलट ती या सगळ्या गोष्टींना उपरोधाने, कधी कधी नको तितक्या क्रूर प्रामाणिकपणासह उलगडते. त्यामुळे तिच्या कामातील तिची शैलीही तितकीच महत्त्वाची आहे. ती स्टेजवर सतत हालचाल करत असते, तिच्या शरीराचा कमालीने वापर करते, आवाजात चढ-उतार आणते. तिच्या देहबोलीत एक प्रकारची आक्रमकता आहे, जी तिच्या शब्दांशी सुसंगत आहे. त्यामुळे तिचं स्टँड-अप केवळ ऐकण्याचा नव्हे, तर पाहण्याचाही अनुभव बनतो.

‘डॉन वाँग’ (2022) या स्पेशलमध्ये तिचा सूर अधिक आत्मपरिक्षणात्मक झाला. घटस्फोटानंतरची अस्वस्थता, पुन्हा ‘डेटिंग’ची भीती आणि स्वतःच्या इच्छांशी चाललेला संघर्ष या सगळ्यांवर ती अधिक परिपक्वपणे बोलते. तिचा विनोद अजूनही तितकाच धारदार आहे, पण त्यात आता एक प्रकारचा थकवा आणि परिपक्वता जाणवते. हा बदल तिच्या कारकीर्दीला, तिच्या प्रवासाला अधिक मानवी बनवतो.

अली वाँगची सर्वात मोठी ताकद म्हणजे ती स्वतःला कधीही पवित्र किंवा आदर्श म्हणून सादर करत नाही. ती लोभी आहे, ती रागावलेली आहे, ती कामुक आहे, ती अपूर्ण आहे आणि हे सगळं ती प्रेक्षकांसमोर निर्भीडपणे मान्य करते. तिचा विनोद हा स्त्रीच्या ‘सभ्य’ प्रतिमेविरुद्धचा एक प्रकारचा बंड आहे. त्यामुळेच ती अनेकांना धक्का देते, पण त्याच वेळी अनेकांना मुक्तही करते.

आधुनिक स्टँड-अपच्या संदर्भात अली वाँग ही केवळ एक यशस्वी कॉमेडियन नसून एक सांस्कृतिक शक्ती आहे. तिच्या विनोदांमधून स्त्री-देह, विवाह, कामुकता आणि सत्ता यांच्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे पाहायला मिळतात. त्यात एक खोल, अस्वस्थ करणारी जाणीव असते, ती म्हणजे आपण ज्या गोष्टींना ‘नॉर्मल’ मानतो, त्या प्रत्यक्षात किती बनावट आणि अन्यायकारक असू शकतात याची जाणीव. त्यामुळेच अली वाँगचं काम एका स्त्रीचं स्वतःच्या शरीरावर, इच्छांवर आणि आयुष्यावर हक्क सांगणं आहे. ते कधी अश्लील वाटतं, कधी क्रूर, कधी अतिशय मजेशीर, पण ते कधीही खोटं वाटत नाही आणि कदाचित म्हणूनच आजच्या कॉमेडीच्या पटलावर अली वाँगचा आवाज इतका स्पष्ट व अपरिहार्य वाटतो.

(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)