
भुयारी मेट्रो मार्गिका-3 प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणांहून स्थलांतरित केलेल्या झाडांच्या पुनर्लागवडीबाबत मुंबई मेट्रो रेल काॉर्पोरेशनचा (एमएमआरसी) निष्काळजीपणा उजेडात आला आहे. मुंबई सेंट्रल येथील जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकाजवळ 20 हून अधिक झाडांची पुनर्लागवड करण्यात आली. मात्र त्यांना पुरेसे पाणी पुरवणे व इतर देखभाल करण्याकामी एमएमआरसी बेफिकीर राहिली आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या पूर्णपणे सुकल्या असून झाडे जगण्याची चिन्हे कमी आहेत.
2019 मध्ये भुयारी मेट्रोच्या कारशेड उभारणीवेळी आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यामुळे मेट्रो-3 प्रकल्प सुरुवातीलाच वादात सापडला होता. पर्यावरणवादी संघटनांनी झाडे वाचवण्यासाठी जोरदार लढा दिला होता. त्यानंतरही या प्रकल्पांतर्गत झाडांची योग्य देखभाल ठेवण्यात एमएमआरसी प्रशासन बेफिकीर असल्याचे उघडकीस येत आहे. मुंबई सेंट्रल येथील जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच विविध प्रकारच्या 20 ते 22 झाडांची पुनर्लागवड करण्यात आली आहे. त्या झाडांना दररोज पुरेसे पाणी देणे, त्यांची योग्य प्रकारे देखभाल करणे आवश्यक होते. यात एमएमआरसी प्रशासनाने हयगय केल्यामुळे झाडे मरण्याच्या स्थितीत आहेत. प्रकल्पांतर्गत कामात आड आलेली झाडे हटवून त्यांच्या पुनर्लागवडीचा केवळ ‘दिखावा’ केल्याचे चित्र दिसून येत आहे. एमएमआरसीने झाडांना पुरेसे पाणी तसेच देखभालीसाठी विशेष कर्मचारी तैनात न केल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
एमएमआरसी म्हणे, ही नैसर्गिक प्रक्रिया!
जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकाजवळ 10 दिवसांपूर्वी नर्सरीमधून स्थलांतरित करून 22 झाडांची लागवड केली आहे. पुनर्लागवडीनंतर झाडांना तात्पुरत्या स्वरूपाचा ताण येतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. झाडे पूर्णपणे सशक्त व स्थिर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. आम्ही झाडांची नियमित देखभाल करीत आहोत, असे एमएमआरसीने म्हटले आहे. प्रत्यक्षात दगडांच्या ढिगाऱ्यात पुनर्लागवड केलेली झाडे जगतील की नाही, याबाबत पर्यावरणवाद्यांनी शंका उपस्थित केली आहे.
मेट्रो प्रशासनाचा केवळ दिखावा
मेट्रो प्रशासन पर्यावरणाबाबत गांभीर्यशून्य आहे. मागील काही वर्षांत पुनर्लागवड केलेल्या झाडांपैकी हजारो झाडे मरण पावली आहेत. मेट्रो प्रशासन केवळ झाडांच्या पुनर्लागवडीचा दिखावा करते. झाडे जगू दे वा मरू दे, त्यांना काहीच सोयरसुतक नसते. z झोरू बाथेना, पर्यावरण कार्यकर्ते





















































