इक्बाल मिर्चीशी संबंधित हॉटेलवर पालिकेचा बुलडोझर, न्यायालयाची पाडकामाला परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दिवंगत इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या सांताक्रुझ येथील मिनहाज हॉटेल लवकरच जमीनदोस्त होणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने सदर हॉटेल पाडण्यास पालिकेला परवानगी दिली.

मिनाझ हॉटेल सांताक्रुझ परिसरात असून ज्या इमारतीत हॉटेल आहे ती इमारत अतिशय जीर्णावस्थेत उभी आहे. इमारत जमीनदोस्त करणे गरजेचे असल्याने पालिकेने तसा अर्ज ईडीकडे केला होता. या प्रकरणात हॉटेलच्या मालकांना नोटीस बजावण्यात आली होती, मात्र कोणतीही हरकत नोंदवण्यासाठी कोणीही न्यायालयात हजर राहिले नाही. विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी महानगरपालिकेने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही इमारत धोकादायक व जीर्ण स्थितीत असल्याने संभाव्य अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी ती पाडणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. न्यायालयाने याची दखल घेत प्राथमिकदृष्टय़ा इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवत हॉटेलवर कारवाई करण्याची परवानगी पालिकेला दिली.