रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार; पाच जण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबारप्रकरणी पाच जणांना जुहू पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी रोहित शेट्टी याचा जबाब नोंदवला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर  रोहित शेट्टी यांच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी हा जुहूच्या हास्य कलाकार मेहमूद चौकात शेट्टी टॉवर इमारतीत राहतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पावणे एकच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाला. रात्री घराबाहेर तैनात असलेला सुरक्षा रक्षक हा आत गेला. तेव्हाच हल्लेखोराने गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोळीबाराची माहिती समजताच काही वेळात जुहू पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी आले होते.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील 5 आरोपींना वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधिताना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन, पुणे शहर

पुण्यातून हल्लेखोरांना घेतले ताब्यात

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित हल्लेखोर पुण्यातील वारजे, कर्वेनगर, धायरीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेने पुणे पोलिसांना माहिती कळवली. पुणे पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले. सिद्धार्थ दीपक येनपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, आदित्य ज्ञानेश्वर गायके, अमन आनंद मराठे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.़

मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

पुणे पोलिसांनी आरोपींना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्लेखोर हे पुख्यात गँगशी संबंधित असल्याची माहिती असून, गोळीबारामागे कोणाचा हात आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. शेट्टी यांच्या घरावर हल्ला करण्यामागे कोणाचा आदेश होता, आर्थिक व्यवहार झाले का, याचा शोध घेतला जात आहे.