
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राजकारण रंगले आहे. अजितदादा एकीकरणासाठी आग्रही होते आणि 12 फेब्रुवारीनंतर त्यासंदर्भात निर्णय होणार होता, असा दावा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
ठरलं म्हणूनच घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे केले
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार आहेत, आम्ही घडय़ाळ चिन्हावर आमचे उमेदवार उभे केले. कारण ठरलं होतं म्हणूनच तो निर्णय घेतला ना, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. मत विभागणी झाली तर काय तोटा होतो हे अजितदादांना नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत कळले होते. त्यामुळे ते विलीनीकरणासाठी आग्रही होते, 8-9 तारखेला लग्न होते, त्यामुळे विलीनीकरण 12 तारखेला ठरलं होतं, स्वतंत्र बैठक घेऊन तो निर्णय होणार होता, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.
आम्ही एनडीएसोबतच राहणार – सुनील तटकरे
राष्ट्रवादीच्या एकीकरणाबाबत बोलताना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, आम्ही एनडीएसोबतच राहणार असे सांगितले. अजितदादा असतानाही आपण ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती, असेही ते म्हणाले.
अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, एकीकरणाबाबत चर्चा झाली; शशिकांत शिंदे यांचा दावा
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विलिनीकरणाची पुठलीही चर्चा नसल्याचे अजित पवार गटाचे नेते म्हणत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलीनीकरणाबाबत चर्चा झाली असा दावा केला आहे. शशिकांत शिंदे यांनी अजित पवार गटामध्ये होत असलेल्या घडामोडींबाबत भाष्य केले. विलीनीकरण करायचे की नाही तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आम्हाला राजकीय स्वार्थ साधायचा नाही, आम्ही फक्त अजितदादांची इच्छा बोलून दाखवली, विलिनीकरणासाठी ते सकारात्मक होते, असे शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


























































