
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘मिया’ (बंगाली भाषिक मुस्लिम) समुदायाबाबत पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘जोपर्यंत मी सत्तेत आहे, तोपर्यंत या लोकांना अडचणींचा सामना करावाच लागेल; आपण त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू, तेव्हाच ते राज्य सोडून जातील’, असे विधान सरमा यांनी केले आहे.
एका शासकीय कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले की, ‘मिया’ समुदाय हा बेकायदेशीररित्या आलेल्या बांगलादेशींचा गट आहे. ते म्हणाले, ‘मी आसाममध्ये राहिल्यास त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागेल. ते येथे शांततेने राहू शकत नाहीत. जेव्हा त्यांना सातत्याने त्रास जाणवेल, तेव्हाच ते आसामबाहेर पडतील’.
यापूर्वी रिक्षा भाड्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचा दाखला देत ते म्हणाले, ‘कायद्यानुसार विचार केला तर त्यांना येथे काम करण्याची परवानगी नाही. आपल्या देशाचे नागरिक आपल्या भूमीत काम करू शकतात, पण बांगलादेशातून आलेले लोक येथे काम कसे काय करू शकतात?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
‘लव्ह जिहाद’ आणि ‘खत जिहाद’चे आरोप
मुख्यमंत्री सरमा यांनी या समुदायावर गंभीर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी मिया समुदायावर लोकसंख्या वाढ, अतिक्रमण, जिहादचे प्रकार यावरून आधी अनेक विधाने केली आहेत.
पुढील जनगणनेत आसाममधील बांगलादेशी मुस्लिमांची संख्या ४० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, असा दावा त्यांनी केला. तर वैष्णव पंथाच्या ‘सत्रा’ (धार्मिक संस्था) आणि जमिनींवर या समुदायाने अतिक्रमण केल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी या समुदायावर ‘लव्ह जिहाद’ आणि शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करून केल्या जाणाऱ्या ‘फर्टिलायझर (खत) जिहाद’मध्ये सामील असल्याचा आरोप केला आहे.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा आक्षेप
सरमा यांच्या या विधानांवर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने’ तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची विधाने ‘मुस्लिमविरोधी, धोकादायक आणि समाजात फूट पाडणारी’ असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी देशाचे सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही बोर्डाने केली आहे.
आसाममधील ‘मिया’ हा शब्द प्रामुख्याने बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जातो, ज्यांच्या नागरिकत्वावरून आसाममध्ये गेल्या अनेक दशकांपासून वाद सुरू आहे.
miyas will face trouble in assam as long as i am in power says cm sarma
assam cm himanta biswa sarma says miya muslims are illegal bangladeshis and will face persistent difficulties until they leave the state.























































