
रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीआधी मुंबई संघाला मोठे बळ मिळाले आहे. विश्रांतीनंतर शार्दुल ठाकूर आणि यशस्वी जैसवाल यांचे मुंबई संघात पुनरागमन झाल्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. कर्नाटकविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीसाठी मुंबईचा 16 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून दुखापतीतून सावरलेला शार्दुल ठाकूर या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करणार आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे तसेच पोटाच्या आजारामुळे यशस्वी जैसवाल संपूर्ण हंगामात बराच काळ अनुपस्थित होता. गट फेरीतील अखेरचे दोन सामनेही त्याला खेळता आले नव्हते. मात्र बाद फेरीसाठी उपलब्ध असल्याची माहिती जैसवालने मुंबई क्रिकेट संघटनेला दिल्यानंतर, संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने त्याचा संघात समावेश केला.
गोलंदाजी आणि फलंदाजीला बळ
गोलंदाजीच्या आघाडीवर मुंबईचा मारा अधिक धारदार झाला आहे. तुषार देशपांडे, ओंकार तारमाळे आणि मोहित अवस्थी यांच्यासोबत शार्दुल ठाकूरची भर पडल्याने वेगवान माऱयाची ताकद लक्षणीय वाढली आहे. गोलंदाजीसह फलंदाजीही मजबूत झाली आहे. फलंदाजीची धुरा यंदाच्या हंगामात सिद्धेश लाडकडे असेल. सिद्धेशने नऊ डावांत पाच शतकांसह 737 धावा अशी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याला सरफराज खान, मुशीर खान आणि यशस्वी जैसवाल यांची भक्कम साथ मिळणार आहे.
हा उपांत्यपूर्व सामना 6 ते 10 फेब्रुवारीदरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट ऍकेडमीच्या मैदानावर होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर टी-20 विश्वचषक सामने होणार असल्याने या सामन्याचे आयोजन बीकेसी मैदानावर करण्यात आले आहे. घरच्या परिस्थितीचा फायदा घेत कर्नाटकला नामोहरम करण्याच्या इराद्याने मुंबई संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.
मुंबई संघ – शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैसवाल, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड, सरफराज खान, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), साईराज पाटील, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओंकार तारमाळे, दिव्येश सक्सेना, सूर्यांश शेडगे.































































