
WPL 2026 चा धुरळा आता अंतिम टप्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये विजेतेपदाची अंतीम लढाई होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत स्मृती मानधनाच्या बंगळुरूने थेट फायनलमध्ये धडक मारली होती. तर जेमिमाच्या दिल्ली कॅपिटल्सने क्लालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाची धुळ चारली आणि फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. विशेष म्हणजे या दोन्ही संघांच्या कर्णधार म्हणजेच स्मृती आणि जेमिमा एकमेकांच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे सामना चुरशीचा आणि रंगतदार होणार यात दुमत नाही.

टीम इंडियाकडून खेळताना स्मृती मानधाना आणि जेमिमा रोड्रीग्ज यांनी अनेक वेळा दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर दोघींची चांगली जुगलबंदी रंगलेली अनेकवेळा चाहत्यांनी पाहिली आहे. मात्र, आता महिला प्रीमियर लीगमध्ये या जीवलग मैत्रिणी एकमेकिंना भिडण्यासाठी आणि पराभव करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्या (5 फेब्रुवारी 2026) बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे. मागच्या वर्षीही हेच दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले होते. मात्र, तेव्हा आरसीबीने मैदान मारलत ट्रॉफी उंचावली होती. आता पुन्हा एकदा आरसीबी विजयी गुलाल उधळणार का? की दिल्ली विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार, हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, साखळी फेरीत आरसीबीने नेत्रदिपक कामगिरी केली आणि अगदी थाटात संघाने फायनलमध्ये धडक मारली. आरसीबीने 8 सामने खेळले असून 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 8 सामने खेळत चार सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तसेच दोन्ही संघ आतापर्यंत एकमेकांना 9 वेळा भिडले आहेत. यामध्ये दिल्लीने 6 वेळा आरसीबीचा पराभव केला आहे. तर आरसीबीने तीन वेळा दिल्लीवर विजय मिळवला आहे.




























































