
महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवस होत आले तरी अद्याप मुंबईमध्ये महापौर कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजप आणि मिंधे गटामध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र मिंधे गटाने ठाण्याच्या बदल्यात मुंबई भाजपला बहाल केली आणि मुंबई भाजपचा महापौर, तर मिंधे गटाचा उपमहापौर अशी वाटणी झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचा महापौर मुंबई शहरावर येणे हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल, असे ते गुरुवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, मुंबईचे अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली. ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातात दिली जाईल. भाजपची भूमिका कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाची संबंधित आहे. महाराष्ट्राच्या अखंडतेविषयी भाजपची वेगळी मतं आहेत. अशावेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपचा महापौर येणे हा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुखत दिवस असेल.
मराठी झेंडा फडकावा म्हणून मराठी माणसाने प्रचंड ताकद लावली. पण दुर्दैवाने भाजपबरोबर गेलेल्या गद्दारांमुळे मुंबई आणि मराठी माणसाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. ते नुकसान करण्याच्या बदल्यात हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल असे दिसते, असे राऊत म्हणाले.
महापौरांसाठी अडीच कोटींची गाडी खरेदी करण्यात आल्याच्या वृत्तावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. भाजपला खरेदी विक्रीमध्ये फार रस आहे. महापौरांसाठी गाडी घेतली असेल तर फिरू द्या त्यांना. भाजपच्या महापौरांना कोण बघतंय? मुंबईमध्ये शिवसेनेच्या महापौरालाच तेज, ताकद आहे. भाजपच्या गाड्या येतात आणि झेंडा फडकावत जातात. तसेच गाडीवर भगवी पट्टी लावून मुंबई अदानीला विकण्याचे त्यांचे धोरण आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
चंद्रपूर महानगरपालिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भात जो निर्णय घेतला आहे तो असा आहे की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजप बरोबर जाणार नाहीत. आमचे जिल्हाप्रमुख किंवा जे निवडून आलेले लोक आहेत त्यांना स्पष्ट सूचना आहेत की, आपण एक तर विरोधी पक्षात बसू… विरोधी पक्षनेता म्हणून काम करू, नाहीतर जी काही चर्चा करायची ती काँग्रेस बरोबर करू. पण भाजप बरोबर जाण्यासंदर्भातले कोणतेही संकेत उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही.



























































