
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत जोरदार शाब्दिक फैरी झडल्या. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांच्या टिकेला सडेतोड प्रत्युत्तर देत भाजपच्या मंत्र्यांवर बरसले. तुमचा पक्ष असा आहे की त्यावर बोलूच नये. तुम्हाला तर मोदींनी वेठबिगार बनवून ठेवले आहे. तुम्ही आम्हाला शिकवता? असे म्हणत खरगे यांनी भाजपच्या मंत्र्यांना सणसणीत चपराक लगावली.
राज्यसभेचे कामकाज गदारोळातच सुरू झाले. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय लोकशाही म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह येतात. लोकसभेत विरोधी पक्षनेते देशहिताच्या मुद्द्यांवर बोलणार होते. पण त्यांना बोलूच दिले नाही. अशा प्रकारे तुम्ही सभागृह कसे काय चालवू शकता? असा सवाल खरगे यांनी लोकसभेच्या कार्यवाहीवर उपस्थित केला. यावर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी उत्तर दिले. लोकसभेतील कार्यवाहीवर राज्यसभेत चर्चा होऊ शकत नाही, असे नड्डा म्हणाले.
नड्डांच्या उत्तरावर खरगे पुन्हा बोलले. ४ दिवसांपासून लोकसभेचं कामकाज ठप्प आहे. विरोधी पक्षनेत्याला का बोलू दिले जात नाही? आणि दोन्ही सभागृह मिळूनच संसद बनते. लोकसभा आणि राज्यसभा हे संसदेचे स्तंभ आहेत. सरकार आपल्या चुका लपवण्यासाठी लोकसभेचं कामकाज चालू देत नाहीये, सभागृह पंगू करून ठेवले आहे. मोदी सरकार देशाला धोका देत आहे, देशाचा अपमान करत आहे. आणि त्यावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलतात तर त्यांना बोलू दिले जात नाही. हे देश आणि लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपचे नेते पुन्हा-पुन्हा पंडित नेहरू, इंदिरा गांधीजी यांच्याबद्दल अपशब्द बोलत आहेत. आणि तुम्ही सभागृहाची कार्यवाही आणि निमांवर बोलता? असा हल्ला खरगे यांनी चढवला.
आक्रमक झालेल्या मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची जीभ घसरली. लोकसभेचे कामकाज तुम्ही चालू दिले नाही. लोकशाही धोक्यात आहे, असं बोलणं चुकीचं आहे. आणि याचा निषेध करतो. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण आपल्या पक्षाला ‘अबोध बालक’चे बंधक बनवू नका, असे नड्डा म्हणाले. यामुळे खरगे संतापले. सत्ताधाऱ्यांनी अशा भाषा वापरणं निषेधार्ह आहे. लोकसभेतील कामकाजावर राज्यसभेत बोलणं योग्य नाही असं तुम्ही म्हणतात. पण संसदीय लोकशाहीत ४-४ दिवस संसदेत विरोधी पक्षनेत्याला का बोलू दिले जात नाही? आणि लोकसभेत जे मुद्दे उपस्थित केले जातात त्यावर राज्यसभेत चर्चा होते. लोकसभा आणि राज्यसभा मिळून सरकार चालतं. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. सत्ताधारी सतत टोकत असता तुमचा पक्ष असा आहे, तुमचा पक्ष तसा आहे. पण तुमचा पक्ष असा आहे की त्यावर काही बोलूच नये. तुम्हाला तर मोदींना बंधक बनवले आहे. आणि तुम्ही मला शिकवताय? त्यांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही. भाजपचे लोक मोदींचे वेठबिगार आहेत, अशी सणसणीत चपराक मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावली. मात्र, राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्ण यांनी आक्षेप घेत वेठबिगार हा शब्द कामकाजातून वगळण्याची सूचना दिली. आमच्या पक्षात काय सुरू आहे यावर तुम्ही टीका करू शकत नाही. आमचा पक्ष तुमच्या सारखा लिंचिंग करत नाही, शिवीगाळ देत नाही, बलात्कार करत नाही, त्याला समर्थन करत नाही, असा घणाघात खरगे यांनी केला. यावर सभापतींनी पुन्हा आक्षेप घेत असंसदीय शब्द वगळण्याची सूचना केली. यानंतरही खरगे थांबले आहेत. ज्या प्रकारे हे लोक लोकशाही अक्षरशः चिरडत आहेत. आणि विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाहीत, हे जर निवडून आलेल्या सदस्यासोबत होत असेल तर नमानिर्देशित केलेल्या सदस्यांचं काय? यांची काय हालत होईल? असे खरगे म्हणाले. हे लोक लोकशाही चिरडण्याचं काम करत आहे आणि म्हणून आम्ही बोलतोय. नेहरूजी हे सर्वाधिक लोकशाहीवादी होते, हे लोक नाही. हे लोक फक्त नेहरूंवर टीका करतात, असे हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.


























































