ट्रम्प यांचा ‘फॅमिली फर्स्ट’ फॉर्म्युला; वर्षभरात कमावले 12 हजार कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची माळ दुसऱ्यांदा गळ्यात पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टऐवजी फॅमिली फर्स्ट फॉर्म्युला राबवल्याचे समोर आले आहे. सत्तेत आल्यानंतर वर्षभरात ट्रम्प कुटुंबीयांनी तब्बल 12 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी माहिती उघड झाली आहे.

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांची डॉक्युमेंट्री आली होती. या चित्रपटासाठी ट्रम्प पुटुंबाला अॅमेझॉनकडून 256 कोटी रुपये मिळाले आहेत. अॅमेझॉनने अन्य प्रोजेक्टच्या तुलनेत या चित्रपटाला जास्त पैसे दिले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खटल्यातूनही भरमसाट पैसे मिळत आहेत. एबीसी न्यूज, मेटा, पॅरामाउंट आणि यूटय़ूब आदींकडून ट्रम्प पुटुंबाला अब्जावधी रुपये देण्यावर सहमती दर्शवली आहे. मस्क यांच्याकडूनही 90 कोटी रुपये दिले जात आहेत. ट्रम्प यांनी कंपन्यांशी समझोता करून 823 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कतारने ट्रम्प कुटुंबाला 747 जेट विमान दिले आहे. या जेटची किंमत 3, 660 कोटी रुपये आहे. मागील वर्षी संयुक्त अरब अमिरातच्या एका कंपनीने ट्रम्प यांच्या कंपनीसोबत 18 हजार कोटींची डील केली आहे. विविध क्रिप्टो करन्सीकडून 7 हजार 29 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. वर्षभरात ट्रम्प यांना 12 हजार कोटींची कमाई झाली.