
विरोधी गटाचा उमेदवार निवडला तर निधी देणार नाही, अशी धमकी सातत्याने देणारे मंत्री नितेश राणे आज पुन्हा बरळले. मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देण्याची जबाबदारी माझी आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी कोल्हापूर येथे निवडणूक प्रचारादरम्यान केले.
मुख्यमंत्री, पंतप्रधान, ग्रामविकास मंत्री, अर्थखाते आमच्याकडे म्हणजे निधी देण्याचा अधिकार असलेले सर्व लोक आमच्या पक्षाचे आहेत. बाकीच्या पक्षांकडे काही अधिकारच नाही, सरकारमध्ये निधी वाटण्याचे आणि देण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय एकही रुपयाचा निधी मिळू शकत नाही. मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे तुमच्या निवेदनावर ब्लँक चेकप्रमाणे फक्त आकडा टापून निधी मंजूर करू शकतो, असे नितेश राणे म्हणाले.
– देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. तुमच्या परिसराचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचीच सत्ता लागेल. या भागात निधीसाठी आपण निवडणूक लढवण्याची गरज पडते. पाहिजे तेवढा निधी देण्याची क्षमता आमच्याकडे आहे, असे भाष्य नितेश राणे यांनी केले.




























































