
चिपळूण तालुक्यात पंचायत समितीच्या १८ आणि जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी सुरू असलेला जाहीर प्रचार गुरुवारी थंडावला. या निवडणुकीसाठी उद्या शनिवारी ७ रोजी मतदान होत असून, प्रशासन सज्ज आहे. तालुक्यातील २४५ केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये ९० हजार ९३५ पुरुष, तर ९२ हजार ७३८ महिला मतदार असे एकूण १ लाख ८३ हजार ६७३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणुकीसाठी ७ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान मतदान होणार असून, ९ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे. कळवंडे, पेढे, खेर्डी, अलोरे, शिरगांव, सावर्डे, उमरोली, वहाळ, कोकरे या ९ जिल्हा परिषद गटात निवडणुका होत आहेत, तर पंचायत समितीसाठी भोम, कळवंडे, पेढे, दळवटणे खेर्डी, कापसाळ, अलोरे, पिंपळीखुर्द, वेहेळे, शिरगाव, सावर्डे, मांडकी, उमरोली, गुढे, निवळी, वहाळ, कोकरे, कुटरे या १८ गणात विजयासाठी संबंधित उमेदवारांचा कस लागणार आहे. या निवडणुकीत २४५ केंद्रांवर मतदान होणार आहे. यातील ३१ मतदान केंद्रात १ हजाराहून जास्त मतदारांची संख्या आहे. पेढे येथे ११४९ मतदारांचे सर्वात मोठे केंद्र असून, गुढे येथे सर्वाधिक कमी १९२ मतदारांची संख्या असलेले केंद्र आहे. यावेळी ४०४६ मतदार हे दुबार मतदार आढळले आहेत; मात्र त्यांना कोणत्याही एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. त्यासाठी संबंधित दुबार मतदारांचे प्रशासनाकडून लेखी पत्र घेण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी ३४० पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच तीन फिरते भरारी पथक कार्यरत राहिले. पेढे फरशीतिठा, कुंभार्ली चेकपोस्ट, खेरशेत टोलनाका, मार्गताम्हाणे सुरळ फाटा, आबलोली मूर्तवडे फाटा येथे स्थिर सर्वेक्षण पथके तैनात ठेवली होती. ही पथके कार्यरत असली तरी कुठेही कारवाई झालेली नाही; मात्र आता ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे.
गुरुदक्षिणा सभागृहात मतमोजणी
चिपळूण शहरातील युनायटेड हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात ९ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. येथूनच मतदान केंद्रांचे साहित्य व मतपेट्यांचे वितरण केले जात आहे. शुक्रवारी संबंधीत मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना करण्यात आल्या. सकाळी ७ वाजल्यापासून दुपारपर्यंत ही प्रक्रीया सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतपेट्या रवाना करण्यात आल्या. शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवडणूक यंत्रणा मार्गस्थ करण्यासाठी मग्न होती. एसटी व खासगी गाड्यांच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील २४५ मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना झाल्या. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आतापासून ठेवण्यात आला आहे.




























































