
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यामधून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीन शिलेदार जिल्हा परिषद गटात विजयी झाले असून त्यांनी दिग्गज मंडळींचा पराभव केला आहे. संगमेश्वर तालुक्यात अजूनही शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करिष्मा कायम असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कडवई गटातून संतोष थेराडे, कसबा गटातून विशाखा कुवळेकर तर साडवली जिल्हा परिषद गटातून नेहा माने यांनी विजय मिळवला आहे.
कडवई जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद म्हस्के यांनी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र या जिल्हा परिषद गटात पूर्वीपासून प्रतिनिधित्व करणारे संतोष थेराडे यांनी केलेली विकास कामे, त्यांचा या गटात असणारा सातत्यपूर्ण संपर्क, तळागाळातील लोकांसाठी केलेले काम आणि निवडणुकीदरम्यान जीवाची बाजी लावून केलेला प्रचार यामुळे संतोष थेराडे यांनी महायुतीचे उमेदवार विनोद म्हस्के यांचा दुसऱ्या वेळी पराभव केला आहे.
सर्वाधिक महत्त्वाची लढत ठरली ती, कसबा जिल्हा परिषद गटात. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असणाऱ्या रचना राजेंद्र महाडिक यांना पुन्हा एकदा कसबा जिल्हा परिषद गटातून शिंदे गटातून उमेदवारी मिळाली होती. या गटातून यापूर्वीही महाडिक यांनीच नेतृत्व केलं होतं. त्यांच्यासमोर नवख्या असणाऱ्या विशाखा विजय कुवळेकर यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. कुवळेकर या जरी नवख्या असल्या तरी, त्यांना हलक्यात घेणे शिंदे गटाच्या रचना महाडिक यांना भारी पडल्याचे आज जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. विशाखा कुवळेकर यांनी कसबा जिल्हा परिषद गट अक्षरशः पिंजून काढला. ज्यावेळी रचना महाडिक यांनी पक्ष बदलला आणि त्या शिंदे गटात सामील झाल्या तरीही या गटातील मतदार मात्र शिवसेनेकडेच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कायम राहिल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. राजकारणात नवख्या असलेल्या विशाखा विजय कुवळेकर यांनी अनुभवी आणि जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून काम केलेल्या रचना राजेंद्र महाडिक यांचा पराभव करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कसबा जिल्हा परिषद गटात अभेद्य असल्याचे आणि त्यांचा कोणीही पराभव करू शकत नसल्याचे आजच्या विजयातून दाखवून दिले. कसबा कसबा गटातील आजचा निकाल हा शिंदे गटाला हादरा देणारा ठरला आहे.
साडवली जिल्हा परिषद गटात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नेहा रवींद्र माने यांनाच पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. नेहा माने यांचा साडवली जिल्हा परिषद गटात असणारा संपर्क, त्यांनी आजवर केलेली विकास कामे तसेच राज्यमंत्री असणाऱ्या पती रवींद्र माने यांनी संगमेश्वर तालुक्याचा विकासाच्या दृष्टीने केलेला कायापालट याचा फायदा नेहा माने यांना झाला. तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिंदे गटात प्रवेश केला असला तरी नेहा आणि रवींद्र माने हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहिले. याचबरोबर साडवली जिल्हा परिषद गटातील मतदार देखील शिवसेनाशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रामाणिक असल्याचे आज नेहा रवींद्र माने यांनी मिळवलेल्या विजयावरून स्पष्ट झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांपैकी तीन जिल्हा परिषद गटावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार विजयी झाल्याबद्दल तालुक्यातून शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला आहे.

























































