
स्वमग्न मुलांना मुक्तपणा व सुरक्षित जागा मिळावी यासाठी कल्याणच्या बारावे परिसरात रिंगरोडलगत ऑटिझम व्हिलेज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुढाकार घेतला असून १२ हजार ७७२ चौरस मीटर एवढ्या विस्तीर्ण जागेत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येईल. या ठिकाणी सेन्सरी गार्डन, पाथ वे, खेळणी, थेरपी सेंटर अशा विविध सुविधा उभारण्यात येणार आहे. या व्हिलेजचा उपयोग कल्याण-डोंबिवलीसह विविध शहरांमधील स्वमग्न मुलांना होणार असून यानिमित्ताने त्यांना हक्काचे गाव मिळणार आहे.
ऑटिझम ही मेंदूशी संबंधित स्थिती समजली जाते. त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) असेही म्हटले जाते. या मुलांना मुक्तपणे जगण्यासाठी आपलीशी वाटणारी सुरक्षित जागा हवी असते. मात्र पालकांपुढे ते एक मोठे आव्हान आहे. ही गरज लक्षात घेऊनच पालिकेने ऑटिझम व्हिलेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण परिसर अतिशय सुरक्षित, शांत आणि उपचारपूरक असे वातावरण असेल. या व्हिलेजच्या दुसऱ्या बाजूस सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले उद्यानही ‘ विकसित केले जाणार आहे.
आत्मविश्वास वाढणार
खेळत असतानाच या मुलांना उपचार मिळणार असल्याने त्यांच्यातील संवादकौशल्य सुधारेल व आत्मविश्वासही वाढेल असा विश्वास पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला आहे.






























































