
अमेरिकेशी केलेल्या मुक्त व्यापार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला. हा करार म्हणजे ‘होलसेल शरणागती’ असून मोदी सरकारने आमच्या आईला विकले आहे. ‘भारतमाते’ला विकले आहे. असे करताना तुम्हाला लाज नाही वाटली का,’ असा घणाघात राहुल यांनी केला.
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. ‘‘व्यापार कराराद्वारे मोदी सरकारने हिंदुस्थानची ऊर्जा, सुरक्षा अमेरिकेकडे गहाण टाकली. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड केली. आपण कोणाकडून तेल खरेदी करायचे हे आता अमेरिका ठरवणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. पंतप्रधानांनी एका भयंकर वादळासाठी देशाचे दरवाजे उघडले आहेत. हे वादळ गरीब शेतकऱ्यांना चिरडणार आहे. आजवर कोणत्याही पंतप्रधानाने असे केले नव्हते. मोदींनी 150 कोटी हिंदुस्थानींचे भवितव्य पणाला लावले आहे,’’ असे राहुल गांधी म्हणाले.
स्वतःची ताकद ओळखा!
‘‘जगात अनेक देशांत युद्धे सुरू आहेत. आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ लढलोय. एका खतरनाक जगाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. अशा वेळी आपण स्वतःची ताकद ओळखली पाहिजे आणि देशातील जनता ही आपली ताकद आहे. या जनतेचे, अन्नाचे व ऊर्जेचे आपण रक्षण केले पाहिजे,’’ असे राहुल गांधी म्हणाले.
अनिल अंबानींना जेलमध्ये का टाकले नाही?
उद्योगपती अनिल अंबानी यांना तुरुंगात का टाकले नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी या वेळी केला. ‘‘अनिल अंबानी यांचे नाव एपस्टीन फाइल्समध्ये आहे, म्हणूनच त्यांना जेलमध्ये टाकले नाही. अंबानींची एपस्टीनशी ओळख कोणी करून दिली हे मला माहीत आहे आणि मंत्री हरदीपसिंग पुरी यांनाही माहिती आहे. त्यांनी त्याचे उत्तर द्यायला हवे,’’ असे सूचक वक्तव्यही राहुल यांनी केले.
अमेरिकेने मोदींचा गळा पकडलाय!
राहुल गांधी यांनी मार्शल आर्ट्सचे उदाहरण देत मोदींवर तोफ डागली. ‘‘अमेरिकेशी झालेला करार पूर्णपणे तर्कहीन आहे. सर्वसामान्य परिस्थितीत कोणीही असा करार मान्य करणार नाही. मोदींनी तो मान्य केला. त्यांनी देश विकला, कारण अमेरिकेने त्यांचा गळा पकडला आहे. मार्शल आर्टमध्ये सर्वप्रथम प्रतिस्पर्ध्याचा गळा पकडला जातो. त्यानंतर गळा दाबला जातो. गळा दाबला गेल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्ती जमिनीवर हात आपटत पराभव मान्य करतो. मोदींची गत तीच झाली आहे.’’
मोदी सरकारच्या जागी इंडिया आघाडीचे सरकार असते तर आम्ही अमेरिकेला ठणकावून सांगितले असते. करार हवा असेल तर आमच्याशी बरोबरीच्या नात्याने बोला. आम्ही तुमचे नोकर नाही. आम्ही आमच्या शेतकऱ्यांचे, ऊर्जेचे संरक्षण करणारच! आम्ही हिंदुस्थानला पाकिस्तानच्या पातळीवर आणले नसते. – राहुल गांधी
मोदींच्या डोळ्यात भीती दिसते. ते डोळ्याला डोळा मिळवू शकत नाहीत. – राहुल गांधी




























































