
कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात एका १८ वर्षीय ट्रान्सजेंडर महिलेने भीषण नरसंहार घडवून आणला आहे. जेसी वॅन रूटसेलार असे या हल्लेखोर मुलीचे नाव असून, तिने आपल्या राहत्या घरी आई आणि ११ वर्षांच्या सावत्र भावाची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर जुन्या शाळेत जाऊन अंदाधुंद गोळीबार केला. या संपूर्ण घटनेत हल्लेखोर महिलेसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जेसीने मंगळवारी प्रथम आपल्या घरी ३९ वर्षीय आई आणि सावत्र भावाचा जीव घेतला. त्यानंतर तिने टंबलर रिज येथील तिच्या जुन्या हायस्कूलमध्ये प्रवेश केला. तिथे तिने एका ३९ वर्षीय शिक्षिका आणि पाच विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये १२ वर्षांच्या तीन मुली आणि १२ व १३ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या भीषण हत्याकांडानंतर जेसीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
हल्लेखोर आणि मानसिक आरोग्य
पोलीस कमांडर ड्वेन मॅकडोनाल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसी ही मानसिक आजाराने ग्रस्त होती. यापूर्वीही अनेकदा तिच्या घरी मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी पोलीस गेले होते. विशेष म्हणजे, तिच्याकडे असलेले शस्त्र परवाना संपलेला होता आणि यापूर्वी तिची शस्त्रे जप्त करण्यात आली होती, मात्र ती पुन्हा तिला परत करण्यात आली होती. तिने चार वर्षांपूर्वीच याच शाळेतून शिक्षण सोडले होते.
देशात शोककळा
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘संपूर्ण देश पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभा आहे’, असे म्हणत त्यांनी सरकारी इमारतींवरील ध्वज सात दिवस अर्ध्यावर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कॅनडाच्या इतिहासातील २०२० नंतरचा हा सर्वात मोठा आणि भीषण गोळीबार मानला जात आहे.
























































