हिंदुस्थानी मुस्लिम देखील हिंदू आहेत, मोहन भागवत यांचं वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या उत्तर प्रदेशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मुस्लिम समुदायाबाबत मोठे विधान केले आहे. “हिंदुस्थानात राहणारे मुस्लिम देखील हिंदूच आहेत, ते काही अरब देशांतून आलेले नाहीत,” असे भागवत म्हणाले आहेत. लखनौमध्ये एका कार्यक्रमात ते असे म्हणाले आहेत.

मोहन भागवत यांनी घरवापसीच्या मोहिमेवर भर देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “घरवापसीचे काम अधिक वेगाने व्हायला हवे. तसेच, जे लोक पुन्हा हिंदू धर्मात परततील, त्यांची पूर्ण काळजी घेण्याची आणि त्यांना सामावून घेण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे.”

हिंदूंच्या लोकसंख्याबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “ज्या समाजाचा सरासरी लोकसंख्या दर ३ पेक्षा कमी असतो, तो समाज भविष्यात संपुष्टात येतो. सध्या आपला दर २.१ वर आहे, जो किमान ३ असायला हवा. त्यामुळे आता जे तरुण विवाह करत आहेत, त्यांनी किमान तीन मुले जन्माला घालण्याचे कर्तव्य पार पाडावे.” विवाहाचा उद्देश केवळ वासनापूर्ती नसून सृष्टी पुढे नेणे हा असावा, असेही ते म्हणाले.

यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांवर बोलताना ते म्हणाले की, ही तत्त्वे कोणा एकाच्या विरोधात नसून सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी आहेत. सामाजिक समरसतेचे उदाहरण देताना त्यांनी एक मार्मिक उदाहरण दिले. ते म्हणाले, “जर एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली असेल, तर बाहेर येण्यासाठी तिला हात वर करावा लागेल आणि बाहेर असलेल्या व्यक्तीला तिला ओढण्यासाठी थोडे खाली वाकून हात द्यावा लागेल. जेव्हा दोन्ही बाजूंकडून हात पुढे केले जातील, तेव्हाच प्रश्न सुटतील.”