
सलग तीन पराभवानंतर नेपाळने अखेर टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी स्कॉटलंडचे 171 धावांचे आव्हान 4 चेंडू आणि 7 विकेट राखून सहजगत्या पार पाडत आपल्या वर्ल्ड कप अभियानाचा शेवट सुखद केला.
स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना मायकल जोन्सच्या 71 धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर 170 धावा केल्या. जोन्सने जॉर्ज मुन्सेबरोबर 80 धावांची सलामी दिली तर ब्रॅण्डन मॅकमलनसह 52 धावांची भर घातली. तो बाद झाल्यानंतर त्यांचे धडाधड फलंदाजही बाद झाले. या धावांचा पाठलाग करताना नेपाळच्या कुशाल भुरटेल (43), आसिफ शेख (33) आणि रोहित पौडेल (16) यांनी संघाला शंभरीजवळ नेले तर त्यानंतर दीपेंद्र ऐरी (50) आणि गुलशन झा (24) यांनी चौथ्या विकेटसाठी 73 धावांची अभेद्य भागी रचत नेपाळच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. दिपेंद्रने आपल्या 23 चेंडूंच्या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकार ठोकले. तोच सामनावीर ठरला.























































