
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने मागील वर्षी जाहीर केला. मराठी माणसांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्यामुळे यंदा स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवस कार्यक्रम प्रचंड जल्लोषात साजरा केला जाणार आहे. महासंघाने कार्यक्रमाची जोरदार तयारी केली असून भगवे झेंडे, पताका आणि मराठी भाषा दिवसाचे बॅनर्स लावून संपूर्ण परिसर भगवामय करण्यात येणार आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे 27 फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ सालाबादप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृह येथे शुक्रवारी सायंकाळी 5 ते रात्रौ 10 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच शिवसेना नेते, उपनेते आणि लोकप्रतिनिधी, विविध आस्थापनांतील स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील. महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले जात आहे. नियोजनासाठी महासंघ पदाधिकारी, संलग्न समित्यांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमस्थळ परिसरात भगवे झेंडे, पताका व मराठी भाषा दिवसाचे बॅनर्स लावून परिसर भगवामय केला जाणार आहे.
चळवळीच्या इतिहासात आगळावेगळा कार्यक्रम
मराठी भाषा दिवसाचा कार्यक्रम हा एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणून समितीच्या चळवळीच्या इतिहासात नोंद होईल, असा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यानी करावा. या कार्यक्रमात लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱयांनी व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी कार्यक्रम आयोजनाची माहिती दिली.
विविध कार्यक्रम,पुरस्कार वितरण
या सोहळय़ावेळी मंदार कर्णिक संयोजित व निर्मित प्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संयोजक आदित्य ओक आणि सिंथेसायझर वादक सत्यजित प्रभू यांच्या बहारदार सादरीकरणातून ‘जादूची पेटी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महासंघातर्फे दरवर्षी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अतिविशेष कार्य करणाऱया व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांना प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.





























































