Chandrapur crime news – कारल्याची भाजी बनविल्याने मुलाने आईचा खून केला, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कारल्याची भाजी बनवली या क्षुल्लक कारणावरून मुलाने आईची हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे उघडकीस आली. सुमित्रा पेटकुले (वय – 65) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा जगदीश पेटकुले (वय – 37) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाला दारूचे व्यसन होते. दोन महिन्यांपूर्वी पत्नी घर सोडून गेल्याने तो आईसोबत राहत होता. गुरुवारी कारल्याची भाजी बनविल्याने जगदीशने आईला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, मार वर्मी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रात्री दारूच्या नशेत मुलाने आईचा खून केल्याची घटना समोर येताच गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.