
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत वॉशिंग्टनमध्ये सोमवारी होणारी मुख्य वाटाघाटींची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापार कराराच्या सर्व पैलूंना अंतिम स्वरूप देण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या मुख्य वाटाघाटीकर्त्यांच्या प्रस्तावित बैठकीचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघ २३ फेब्रुवारी रोजी तीन दिवसांची बैठक सुरू करणार होता.
सूत्राने हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारासाठी भारतीय वाटाघाटी पथकाच्या अमेरिकेच्या दौऱ्याबाबत दोन्ही बाजूंच्या मतांबद्दल माहिती दिली. दोन्ही बाजूंना वाटते की भारतीय पथकाच्या प्रस्तावित भेटीला दोन्ही बाजूंकडील नवीन घडामोडी आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी वेळ घेतल्यानंतर अंतिम स्वरूप देण्यात यावे. व्यापार करारावरील ही बैठक परस्पर सहमतीने ठरलेल्या तारखेला पुन्हा नियोजित केली जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ बेकायदा ठरवत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला आहे. या घडामोडींनंतर, बैठक अचानक पुढे ढकलल्याची माहिती आली आहे. त्यामुळे याला महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शुल्कावरील निर्णयानंतर घडामोडी महत्त्वपूर्ण आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर, गेल्या शुक्रवारीच, डोनाल्ड ट्रम्प यांनी कलम १२२ चा वापर करून, पुढील १५० दिवसांसाठी भारतासह जगातील सर्व देशांवर १० टक्के कर लादण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी तो १५% पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे आता टॅरिफ बाबतच्या घडामोडींना वेग आला असून हिंदुस्थान- अमेरिकेमधील बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे.

























































