
लोकल ट्रेनच्या गर्दीमुळे अनेक प्रवासी गेटवर उभे राहतात. या गर्दीत प्रवाशांचा ट्रेनमधून खाली पडून मृत्यू होत असल्याच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन एसी लोकलप्रमाणे बंद दरवाजांची नॉन-एसी लोकल प्रवासी सेवेत दाखल करणार आहे. फेब्रुवारी महिनाअखेरीपूर्वी एक लोकल, तर मार्च महिन्यात दुसरी नॉन-एसी लोकल दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षी जूनमध्ये मुंब्रा स्थानकाजवळ पाच प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्या घटनेनंतर प्रवासी गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला. त्याच अनुषंगाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासन स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकल मध्य रेल्वेवर फेब्रुवारी महिन्याअखेरीपूर्वी चेन्नई आयसीएफमधून दाखल करणार आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकलची चाचणी कुर्ला कारशेडमध्ये घेण्यात आली होती. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण या स्थानकांवर चालवली जाण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ दुसरी स्वयंचलित दरवाजांची लोकल मार्चमध्ये दाखल होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रश्न सुटण्याऐवजी नव्या समस्या उत्पन्न होतील!
मध्य रेल्वेने बंद दरवाजांच्या नॉन-एसी लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्यापूर्वी त्या गाडय़ांमध्ये हवा खेळती राहिल, प्रवाशांना गुदमरण्याचा त्रास होणार नाही, याची पूरेपूर खबरदारी घेतली पाहिजे. या ट्रेनच्या सुरुवातीला काही मोजक्या फेऱ्या धावतील. त्यामुळे लोकलमधून पडून होणारे मृत्यू पूर्णपणे थांबणार नाहीत. जिवघेण्या गर्दीचा प्रश्न सुटण्याऐवजी नव्या समस्या उत्पन्न होतील. एसी लोकलप्रमाणे दरवाजे बंद झाले नाहीत, तर इतर गाडयांचे वेळापत्रक कोलमडेल आणि असुरक्षित प्रवासाची स्थिती जैसे थे राहील.
– मधु कोटियन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ.
घुसमटीचे काय?
बंद दरवाजाच्या नॉन-एसी लोकलमुळे फायदे-तोटे असे दोन्ही अनुभव येतील. बंद दरवाजामुळे प्रवासी फूटबोर्डवर उभे राहणार नाहीत. त्याने लोकलमधून पडून होणारे अपघाती मृत्यू टळतील. मात्र लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे श्वास घेणे मुश्किल होईल. प्रवाशांना गुदमरण्याचा त्रास होईल. हे टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करूनच या लोकल प्रवासी सेवेत दाखल केल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया वाहतूक तज्ञ विवेक पै यांनी दिली.































































