
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 3 हजार तासांचा रेकॉर्डच व्हीएसआर कंपनीकडे उपलब्ध नसल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केला.
रोहित पवार यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याला पायलट म्हणून बोलवले गेले होते अशी माहिती आहे. चौकशीसाठी रोहित हिंदुस्थानात आला होता. दादांच्या अपघाताची सीआयडी गुन्हेगारी अँगलने चौकशी करत असताना व्हीएसआरचा मालक हिंदुस्थानात येतो, तेव्हा नागरी उड्डाण संचालनालयाने सीआयडीला कळवणे आवश्यक का वाटले नाही? असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला आहे.
महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? असा सवाल रोहित पवार यांनी केला.
मिसिंग रेकॉर्डच्या हेराफेरीसाठीच चौकशीला विलंब
व्हीएसआरकडे विमानाच्या 5 हजार तासांपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचा रेकॉर्डच उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी, बनवाबनवी व्हीएसआरला करता यावी यासाठी चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. डीजीसीए आणि व्हीएसआर यांची मिलिभगत आणि यंत्रणांमधील विसंवाद पाहिला तर त्यांच्या लेखी दादांची किंमत किती आहे हे कळून येते, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.



























































