मूळ मालकाच्या वारसांनी अर्ज करूनही तुम्ही त्याची दखल का घेतली नाही? जमीन घोटाळ्याबाबत अंबादास दानवे यांचा भुमरेंना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांचा जमीन घोटाळा उघड केला असून या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावर खासदार संदीपान भुमरे यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्या स्पष्टीकरणावरही अंबादास दानवे यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विटरवर पाच प्रश्नांची एक पोस्ट शेअर केली आहे.

अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेले प्रश्न

१. हिबानामा आणि जन्म तारखेतील तफावत: हिबानामा १९७१ चा दाखवला जात आहे, परंतु संबंधित चालकाचा जन्म १९८५ चा आहे. जन्माच्या १४ वर्षे आधी हा व्यवहार होणे अशक्य आहे. तसेच, हिंदू-मुस्लिम संदर्भात कायद्याने ‘हिबानामा’ होऊ शकत नाही, मग हा हिबानामा झालाच कसा?

२. गट नंबरची दिशाभूल: तुम्ही ज्या गट नंबर १७४ चा उल्लेख करत आहात, तो सध्या अस्तित्वात नाही. सरकारी कागदपत्रांनुसार त्या जागेचा नवीन गट नंबर ८९ असा आहे. मग जुन्या नंबरचा उल्लेख करून तुम्ही नेमकी कोणाची दिशाभूल करत आहात?

३. वारसांच्या हक्काकडे दुर्लक्ष: मूळ मालकाच्या वारसांनी वारंवार अर्ज करूनही खासदार किंवा पालकमंत्री म्हणून तुम्ही त्याची दखल का घेतली नाही? आपल्या चालकाच्या नावावर आर्थिक लाभ लाटण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे का?

४. विधानातील विसंगती (दुटप्पी भूमिका): एकीकडे तुम्ही सांगता की, “सोबतच्या माणसाने बाहेर काय केले हे आपल्याला सांगता येत नाही,” मग याच प्रकरणात तुम्ही त्या चालकाच्या सत्यतेची शाश्वती कशी काय घेता? हा जावेद ‘तो’ नाही, मग कोणता हे स्पष्ट कसरण्याचे निर्देश तुम्ही खासदार म्हणून प्रशासनाला देणार का?

५. बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे मोबदल्याची मागणी: विषय मोबदल्याच्या रकमेचा नाही, तर मुळात तो ‘हिबानामा’ झालाच कसा हा आहे. एका बेकायदेशीर आणि संशयास्पद हिबानाम्याच्या आधारे सरकारी मोबदला (मावेजा) मागण्याची हिंमत होतेच कशी?

काय आहे प्रकरण? 

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जटवाडा, जोगवाडा येथील लता सूर्यभान वाघमारे यांचे खापर पणजोबा पावण्या भिका वाघमारे यांची जुना गट क्रमांक 174मध्ये 23 एकर 3 गुंठे जमीन होती. हैदराबाद संस्थान कायद्यानुसार 31 ऑक्टोबर 1957पासून प्रमाणपत्र देऊन ही जमीन बहाल करण्यात आली. पावण्या वाघमारे यांच्या मृत्यूनंतर ही जमीन कित्येक वर्षे पडीक राहिली. वारसा हक्कानुसार लता सूर्यभान वाघमारे आणि इतर नऊ कुळांमध्ये ही जमीन विभागली गेली. त्यापैकी तीन एकर तीन गुंठे जमीन लता वाघमारे यांच्या वाटय़ाला आली. 1971मध्ये महाराष्ट्र विकास महामंडळासाठी या जमिनीचे संपादन करण्यात आले. समृद्धी महामार्गाला खेटूनच असलेल्या या जमिनीला आता सोन्याचा भाव आला आहे. जमीन संपादनाच्या मोबदल्यात मूळ मालकाच्या कूळ वारसदारांना मोबदला 1150 रुपये देणे बाकी आहे. यासंबंधी महसूलच्या सहाय्यक आयुक्तांनी 23 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे कळवले होते. समृद्धी महामार्गाचे सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हैदराबाद कूळ कायदा 1950च्या कलम 38 (ब)नुसार जावेद रसूल शेख याच्या नावे 1971मध्येच 23 एकर जमिनीचा हिबानामा करून दिल्याचे कळवले.