
काळ्या काचा आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या भरधाव स्कॉर्पिओने सावेडी नाक्याजवळ अक्षरशः मृत्यूचे तांडव घातले. सुसाट गाडीने तीन ते चारजणांना चिरडले. यातील एक तरुण तब्बल शंभर फुटांपर्यंत हवेत उडून रस्त्यावर आदळला. त्यानंतर स्कॉर्पिओ रस्त्याकडेला जाऊन धडकली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर चालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अहिल्यानगर-मनमाड हा प्रचंड वर्दळीचा महामार्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर पोलीस ‘काळ्या काचा’ असलेल्या गाडय़ांवर कारवाईचा देखावा करत आहेत; मात्र आजच्या घटनेने या कारवाईची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
आजच्या घटनेतील स्कॉर्पिओ सिद्धार्थनगर येथील विजू पठारे याच्या मालकीची असल्याचे समोर आले असून, या गाडीने सावेडी परिसरात धुमाकूळ घालत चौघांना उडविले. या भीषण धडकेनंतर स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली आणि तिचा पुढचा भाग पूर्णपणे निकामी झाला.
अपघातावेळी स्कॉर्पिओमागे येणाऱया इतर गाडय़ांचीही एकमेकांना धडक बसल्याने महामार्गावर गोंधळ उडाला होता. प्रत्यक्षदर्शींनी मदतीसाठी धाव घेतली, तोपर्यंत चालक तेथून पसार झाला होता. अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तोफखाना आणि वाहतूक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.




























































