
शहागंजमध्ये हातगाडी चालकांनी गरोदर महिलेला मारहाण केली. या मारहाणीनंतर मनपाने गुरुवारी ३५ हातगाड्यांवर कारवाई केली. रस्त्यावर हातगाड्या लागू नये म्हणून नागरिक मित्र पथकाने दिवसभर गस्त घातली. आज शुक्रवारी सायंकाळी एमआयएमच्या नगरसेवकांनी दादागिरी केल्याने मनपाच्या नाकावर टिच्चून शहागंजमध्ये रस्त्यावर पुन्हा हातगाड्या लावण्यात आल्या.
शहागंजमधील मुजोर हातगाडी चालकांवर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई करीत ३५ हातगाड्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे शहागंज चौक आणि शहागंज रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. रस्त्यावर हातगाड्या लावल्या जाणार नाहीत, याची काळजी मनपाने घेतली. शुक्रवारी दिवसभर शहागंजमध्ये एकही हातगाडी लागली नाही. रस्ता मोकळा झाला. हातगाड्या लावल्या जाऊ नये म्हणून नागरिक मित्र पथकाच्या माजी सैनिकांसह मनपाचे अधिकारी तळ ठोकून होते. पोलिसांची गस्तही सुरू होती.
सायंकाळच्या सुमारास एमआयएमचे आठ ते दहा नगरसेवक विरोधी पक्षनेत्याला सोबत घेऊन शहागंजमध्ये दाखल झाले. हातगाड्या घेऊन फळ विक्रेत्यांना बोलावून घेतले. सिटीचौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी या पोलीस फौजफाट्यासह त्या ठिकाणी हजर झाल्या. मनपाचे अतिक्रमण हटाव पथक त्या ठिकाणी आले. परंतु, नगरसेवकांनी आयुक्तांना सांगून रमजानमध्ये महिनाभर हातगाड्या लावण्याची परवानगी घेतल्याचे सांगून मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला तेथून पिटाळून लावले. एमआयएमच्या नगरसेवकांनी मनपाच्या नाकावर टिच्चून शहागंजमध्ये हातगाड्या लावण्यात आल्या.
कारवाईचा देखावा
मनपाच्या पथकाकडून कारवाईचा देखावा केला गेला. मात्र, संध्याकाळी नगरसेवक येताच अधिकारी तेथून निघून गेले. रस्त्यावर हातगाड्या लागल्या तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
पोलीस उपनिरीक्षकाने भरला दंड
शहागंज येथे हातगाड्या लावल्या जाऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी सिटीचौक ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हे त्यांच्या चारचाकी वाहनातून आले. रस्त्याच्या कोपऱ्याला चारचाकी लावून पोलीस चौकीत बसले. त्याचवेळी नागरिक मित्र पथकाने चारचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षकाने कारवाईसाठी आल्याचे सांगितले तरी, रस्त्यावर वाहन उभे केल्याची दोन हजार रुपयांची पावती उपनिरीक्षकाला दिली. पोलीस उपनिरीक्षकाने दोन हजाराचा दंड भरला.




























































