टिळकनगरमध्ये रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूरच्या अमरमहल येथे रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना भररस्त्यात घडली. टिळक नगर पोलीस सोनसाखळी चोराचा शोध घेत असून 24 तास उलटले तरी त्याचा थांगपत्ता लागू शकलेला नाही.

आरती भिंगारदेव व त्यांच्या सोबत अन्य दोघी रिक्षाने प्रवास करत होत्या. अमरमहल जंक्शनजवळ वाहतूक कोंडीमुळे रिक्षा थांबली असता मागून आलेल्या अज्ञात चोराने आरती यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. संध्याकाळच्या सुमारास भररस्त्यात ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोराचा शोध घेत आहेत. या घटनेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.