
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. इराणने अधिकृतपणे असा दावा केला आहे की, इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या अतिसंवेदनशील अण्वस्त्र तळांना (Nuclear Sites) लक्ष्य केले आहे. या हवाई हल्ल्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाला मोठा फटका बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हवाई दलाने अमेरिकेच्या मदतीने हे ऑपरेशन राबवले. इराणच्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अणुप्रकल्पांच्या परिसरात एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाले. इराणने या हल्ल्याला त्यांच्या सार्वभौमत्वावर झालेला थेट हल्ला म्हटले असून, याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. इराणने म्हटलं आहे की, हा हल्ला केवळ लष्करी कारवाई नसून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे, ज्याचा उद्देश इराणची शक्ती मोडीत काढणे हा आहे.
दुसरीकडे, या हल्ल्यामुळे अण्वस्त्र तळांमधून किरणोत्सर्ग (Radiation) पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. इराणमधील अनेक भागात सध्या हाय-अलर्ट जारी करण्यात आला असून लष्करी हालचाली वाढल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायलने यापूर्वीच इराणला अण्वस्त्र सज्ज होण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

























































