इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान इराणचा मोठा निर्णय; सय्यद माजिद इब्न अल रेजा यांच्याकडे सोपवली संरक्षण मंत्रालयाची धुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल आणि अमेरिका यांच्यासोबत सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या लष्करी नेतृत्वात मोठा बदल केला आहे. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाने सय्यद माजिद इब्न अल रेजा यांची देशाचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. इराणच्या अण्वस्त्र तळांवर आणि गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

सय्यद माजिद इब्न अल रेजा हे इराणच्या संरक्षण क्षेत्रात अनुभवी मानले जातात. विशेषतः लष्करी रणनीती आणि शस्त्रास्त्र उत्पादनामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. इस्रायलने ऑपरेशन रोअरिंग लायन अंतर्गत इराणच्या सुरक्षा यंत्रणेला जे धक्के दिले आहेत, त्यातून देशाला सावरणे आणि लष्करी ताकद पुन्हा संघटित करणे, हे त्यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

हिंदुस्थानच्या या शेजारील प्रदेशात तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच इराणने संरक्षण मंत्री बदलल्यामुळे जागतिक राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. नवे संरक्षण मंत्री इस्रायलच्या आक्रमकतेला काय उत्तर देतात आणि इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची सुरक्षा कशी सुनिश्चित करतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतरची अस्थिरता आणि परकीय हल्ले पाहता, रेजा यांची नियुक्ती इराणला युद्धाच्या काळात स्थिर नेतृत्व देण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.