
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचे सावट आजआशियाई शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आले. या तणावामुळे आशियातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, होळीनिमित्त आज हिंदुस्थानी शेअर बाजार बंद आहेत.
आशियाई बाजारांची स्थिती
युद्धामुळे दक्षिण कोरियाच्या बाजाराला सर्वात मोठा फटका बसला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी (Kospi) निर्देशांक ७.२४ टक्क्यांनी कोसळून ५,७९१ च्या पातळीवर बंद झाला. जपानचा निक्केई (Nikkei) इंडेक्स ३.०६ टक्क्यांनी घसरून ५६,२७९ वर स्थिवरला, तर चीनचा शांघाय कंपोजिट १.४३ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग १.१२ टक्के घसरणीसह बंद झाला.
कच्च्या तेलाच्या किमतीत भडका
युद्धाच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या दोन दिवसांत तब्बल १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा तणाव असाच राहिला तर तेल १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते. याचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर होऊ शकतो. दिल्लीत पेट्रोल १०० रुपयांच्या पार, तर डिझेल ९२ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
दरम्यान, सोमवारी हिंदुस्थानी बाजारातही मोठी पडझड पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स १०४८ अंकांनी (१.२९%) घसरून ८०,२३९ वर, तर निफ्टी ३१३ अंकांनी घसरून २४,८६६ वर बंद झाला होता. परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) काल ३,२९५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.
























































