भाजपचे बेगडी हिंदुत्व उघड, होळीला दारूची दुकाने सुरू ठेवण्यावरून आप आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळीच्या पवित्र सणादिवशी दिल्लीत दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयावरून आता राजकीय रणकंदन माजले आहे. आम आदमी पक्षाने या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर थेट हल्ला चढवला असून भाजपचे हिंदुत्व हे केवळ दाखवण्यापुरते म्हणजेच बेगडी असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी या निर्णयावरून नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

सौरभ भारद्वाज यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, “भारतीय जनता पक्ष नेहमीच स्वतःला हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा रक्षक मानतो. मग आता हिंदूंचा मोठा सण असलेल्या होळीच्या दिवशीच दिल्लीत दारूची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय कोणासाठी घेतला? दरवर्षी होळीला दिल्लीत ड्राय डे पाळला जातो, जेणेकरून सणाचे पावित्र्य राखले जाईल आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. मात्र, यंदा हा नियम धाब्यावर बसवण्यात आला आहे.” X वर एक पोस्ट शेअर करत ते असे म्हणाले आहेत.

सध्या दिल्लीतील उत्पादन शुल्क विभाग हा नायब राज्यपालांच्या अखत्यारीत येतो. यावर बोट ठेवत भारद्वाज यांनी असा आरोप केला की, दिल्लीचे निवडून आलेले सरकार सध्या बाजूला असून नायब राज्यपालांच्या माध्यमातून भाजपच दिल्लीचा कारभार हाकत आहे. त्यामुळे होळीला दारू विक्री सुरू ठेवण्याचा हा वादग्रस्त निर्णय भाजपचाच आहे. सणाच्या दिवशी लोकांच्या हातात रंग देण्याऐवजी दारूच्या बाटल्या देण्याचे काम हे सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली.