
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे आणखी एका नव्या नर वाघाची अधिकृत नोंद झाली असून त्याला ‘STR T9’ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक मार्गदर्शकांनी या वाघाचे ‘शिलेदार’ असे नामकरण केले आहे. या नव्या नोंदीमुळे प्रकल्पातील एकूण वाघसंख्या सातवर पोहोचली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये हा वाघ सातत्याने दिसून येत होता. त्याचे अनेक फोटो व व्हिडिओ वनविभागाच्या हाती लागले असून त्यानंतर त्याची स्वतंत्र ओळख निश्चित करण्यात आली.
सध्या T9 ‘शिलेदार’ हा वाघिणी T5 ‘तारा’च्या क्षेत्रात फिरताना आढळत आहे. विशेष म्हणजे तारा हिच्या क्षेत्रात आधीपासून T1 ‘सेनापती’ आणि T2 ‘सुभेदार’ हे नर वाघ संचार करत आहेत. त्यामुळे तारा कोणत्या नराची निवड करणार, याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
प्रकल्पातील विद्यमान वाघांची यादी पुढीलप्रमाणे आहे : T1 – सेनापती, T2 – सुभेदार, T3 – बाजी, T4 – चंदा, T5 – तारा, T6 – हिरकणी, T9 – शिलेदार
क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, नव्या नर वाघाच्या उपस्थितीमुळे प्रकल्पातील अधिवासाची क्षमता आणि जैवविविधतेची समृद्धी अधोरेखित होते. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वाघांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले की, सह्याद्रीला जोडणारे राधानगरी अभयारण्य तसेच तिलारी-दोडामार्ग वनक्षेत्र हे महत्त्वाचे जंगल कॉरिडॉर वाघांच्या मुक्त संचार व प्रजननासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. या कॉरिडॉरमुळे विविध व्याघ्र अधिवासांमध्ये नैसर्गिक स्थलांतर सुलभ होत असून आनुवंशिक वैविध्य टिकून राहण्यास मदत होते.





























































