राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील, संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेतील 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 7 जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च आहे. याच संदर्भात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल, अशी माहिती दिली. बुधवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या जागेसाठी नाव जाहीर झाले नसल्याचे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ही जागा महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडी एकत्र असेल तेव्हाच ही जागा निवडून येईल. शिवसेना हा विधिमंडळात महाविकास आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे. आमचे 20 आमदार असून काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 10 आमदार आहेत. आम्ही जेव्हा एकत्र राहून तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणे गरजेचे आहे.

उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल. आघाडी असल्याने कोणताही एक पक्ष या संदर्भात निर्णय जाहीर करू शकत नाही. जागा कुणी लढायची हा आघाडी म्हणून निर्णय जाहीर केला जाईल. निर्णय जाहीर करणे कोणत्याही एका पक्षाच्या हातात नाही. तीन पक्ष एकत्र येऊन त्या संदर्भात अंतिम निर्णय होईल आणि मग तो निर्णय जाहीर केला जाईल, असेही राऊत यावेळी म्हणाले.

दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केलेली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केली. तीनही पक्षात चर्चा, संवाद हा सुरू आहे आणि तो संपलेला नाही. जे काही होईल ते एकमताने होईल, असेही राऊत म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीवर चर्चा.. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

तीन पक्ष तीन स्वतंत्र उमेदवार उभे करू शकत नाहीत. एकच उमेदवार उभा राहील आणि तो एकमेकांच्या संमतीने उभे राहील. सातवी जागा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणतीही अडचण दिसत नाही, असेही संजय राऊत ठामपणे म्हणाले.