
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 2025-26 या आर्थिक वर्षासाठी पीएफ खात्यावरील व्याजदर 8.25 टक्के निश्चित केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी ईपीएफओचे व्याजदर स्थिर राहिले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, ईपीएफओने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवला होता.
ईपीएफओने 2024 मध्ये व्याजदरात किरकोळ वाढ करून 2023-24 साठी 8.25 टक्के केला होता, जो 2022-23 मध्ये 8.15 टक्के होता. मार्च 2022 मध्ये, ईपीएफओने त्यांच्या सदस्यांसाठी निवृत्तीनंतरच्या ठेवींवरील व्याजदर 2021-22 साठी 8.10 टक्के होता. जो चार दशकांतील नीचांकी पातळीवर होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक झाली आणि त्यांनी पीएफ व्याजदरांबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर 2025-26 साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर, 2025-26 साठीचे व्याज कोटय़वधी ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा केले जाईल. अर्थ मंत्रालयामार्फत सरकारच्या मंजुरीनंतर ईपीएफओ व्याजदर प्रदान करते.
8.80 टक्के होता सर्वाधिक व्याजदर
2015-16 या वर्षी 8.80 टक्के हा गेल्या काही वर्षांमधील सर्वाधिक व्याजदर कर्मचाऱ्र्यांना पीएफवर मिळाला होता. तर 2013-14 आणि 2014-15 यावर्षी 8.75 टक्के व्याजदर मिळाला होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील कमी करून 8.5 टक्के केला होता. 2018-19 हाच व्याजदर 8.65 टक्के होता.
1.33 लाख खातेदारांना पैसे मिळणार
एखादा व्यक्ती वयाची 55 वर्ष पूर्ण केल्यानंतर किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील तीन वर्ष त्याच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यास ते खाते निष्क्रिय मानले जाते. निष्क्रिय खात्यांमधील 1000 रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेली खाती ईपीएफओकडून निश्चित करण्यात आली आहे. अशा खात्यांमधील रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात ईपीएफओ स्वतःहून पाठवणार आहे. यासंदर्भातील पायलट प्रोजेक्टला ईपीएफओकडून मंजुरी देण्यात आली आहे. ईपीएफओ पहिल्या टप्प्यात 1.33 लाख खातेदारांच्या खात्यात पैसे पाठवणार आहे. या खात्यांमध्ये 5 कोटी 68 लाख रुपये पाठवले जाणार असल्याचे ईपीएफओकडून सांगण्यात आले. ही रक्कम थेट ईपीएफओ खातेदारांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात पाठवली जाईल.
























































