
हिंदुस्थानात बालमृत्यूच्या कारणांमध्ये बदल पहायला मिळत आहेत. संसर्गजन्य रोगांमुळे होणारे मृत्यूदर घटत असतानाच आता जन्मजात दोषांमुळे बालमृत्यू वाढत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानात दरवर्षी सुमारे 6 लाख बालके जन्मजात दोषासह जन्माला येतात. जन्मजात दोषांमुळे होणाऱ्या जागतिक बालमृत्यूमध्ये एकट्या हिंदुस्थानचा 16 टक्के वाटा आहे. मात्र अद्याप या बालमृत्यूची राष्ट्रीय स्तरावर नोंदणीच नाही.
‘स्माईल ट्रेन इंडिया’ आणि ‘बर्थ डिफेक्ट्स रिसर्च फाऊंडेशन’ यांनी संयुक्तपणे सोमवारी नवी दिल्लीत ‘बर्थ अॅनोमलीज नेटवर्क ऑफ इंडिया’ (BIND) व्यासपीठाचे अनावरण केले. याद्वारे जन्मजात दोषांना प्रतिबंध, लवकर निदान आणि दीर्घकालीन उपचारांवर भर देण्यात येणार आहे.
हिंदुस्थानात अद्याप जन्मजात दोषांची नोंद ठेवणारी कोणतीही अधिकृत राष्ट्रीय यंत्रणा नाही. यामुळे अचूक डेटा मिळत नाही आणि आरोग्य नियोजन करण्यात अडचणी येतात. ‘बर्थ अॅनोमलीज नेटवर्क ऑफ इंडिया’ हे नेटवर्क आता अशा रजिस्ट्रीसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
जन्मजात हृदयविकार, दुभंगलेले ओठ, मणक्याचे दोष, वेडेवाकडे पाय आणि डाऊन सिंड्रोम यांसारख्या समस्यांचे प्रमाण देशात लक्षणीय आहे. वेळेवर निदान झाल्यास यापैकी अनेक आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. मात्र, उपचार आणि समन्वयाचा अभाव यामुळे अनेक बालकांचा जीव धोक्यात येत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
सार्वजनिक चर्चेत जन्मजात दोषांकडे अजूनही दुर्लक्ष केले जाते. महानगरांच्या बाहेर या आजारांच्या तपासणीसाठी आणि उपचारांसाठी सक्षम यंत्रणा नसल्याने परिस्थिती गंभीर होत आहे, असे ‘स्माईल ट्रेन’च्या आशिया विभागाच्या उपाध्यक्षा ममता कॅरोल यांनी सांगितले.

























































