
तिरुचिरापल्ली येथील रेल्वे विभागीय कार्यालयाच्या कमानीचे ‘कर्तव्य द्वार’ असे नामकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आज जोरदार तोफ डागली. ‘हिंदी लादण्यासाठी भाजप मर्यादा ओलांडतोय,’ असा संताप स्टॅलिन यांनी व्यक्त केला.
त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली केंद्र सरकार तामीळ आणि इंग्रजी लिपीमध्येही हिंदी नावे घुसवत आहे. हे ताबडतोब बंद झाले पाहिजे. शुद्ध तामीळ भाषेतील नावेच सगळीकडे दिसली पाहिजेत. केंद्र सरकारकडून अरेरावी सुरू आहे. ही अरेरावी अशीच सुरू राहिल्यास त्यांना तामिळींच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा स्टॅलिन यांनी दिला.
केंद्र सरकारने याआधीच ईपीएफओला ‘भविष्य निधी भवन’, नव्या गुन्हेगारी कायद्याला ‘न्याय संहिता’, केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाला ‘जल शक्ती’ अशी हिंदी आणि संस्कृत नावे दिली आहेत, याकडे स्टॅलिन यांनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून लक्ष वेधले.


























































