
सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका 35 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनियरने टोकाचे पाऊल उचलले आणि राहत्या घरी आत्महत्या केली. सुषमा असे मृत महिलेचे नाव असून ती एका मोठ्या अमेरिकन टेक कंपनीत कामाला होती. पाच वर्षांपूर्वी तिचे पुनीत कुमार याच्याशी लग्न झाले होते. दोघांना 4 वर्षांचा मुलगाही होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमाच्या घरात रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार वाद होत होते. सासू कल्पना आणि सुषमा यांचेही पटत नव्हते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांची नेहमी भांडणे व्हायची. मंगळवारी सुषमा आणि तिच्या सासूमध्ये स्वयंपाकाच्या नियोजनावरून मोठा वाद झाला.
सुषमाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सासू तिला स्वयंपाक करू देत नसे आणि विविध मुद्द्यांवरून तिला त्रास देत असे. याच सततच्या घरगुती कलहाला कंटाळून सुषमाने मंगळवारी राहत्या घरी गळफास लावून घेतला. सुषमाच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की, पतीच्या कुटुंबाकडून तिचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पती पुनीत कुमार याला हुंडाबळीच्या आरोपाखाली अटक केली असून सासू कल्पनाचा शोध सुरू आहे. सोलादेवनहल्ली पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आठवडाभरातील दुसरी घटना
याआधी 28 फेब्रुवारी रोजी 27 वर्षीय विद्याज्योती या तरुणीने बागलकुंटे येथील एमईआय लेआउटमधील आपल्या घरी आत्महत्या केली होती. ती ‘बॉश’ कंपनीत कार्यरत होती. ती एका दुसऱ्या जातीतील तरुणाच्या प्रेमात होती आणि दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली होती. मात्र, प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, तिच्या पालकांनी एका ज्योतिषाचा सल्ला घेतला होता. त्या ज्योतिषाने असे भाकीत केले होते की, लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद होऊन घटस्फोट होऊ शकतो. हा ‘दोष’ निवारण्यासाठी ज्योतिषाने 9 दिवसांचे विधी करण्यास सांगितले होते. या विधीच्या शेवटच्या दिवशी, तिचे आई-वडील घराबाहेर असताना विद्याज्योतीने पंख्याला लटकून आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

























































