T20 WC 2026 – न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत फिनच्या त्सुनामीने द. आफ्रिकेला झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेच्या दासुन शनाकाच्या झंझावाती खेळीमुळे अनपेक्षितरीत्या सुदैवाने उपांत्य फेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंडने फिन ऍलनच्या 33 चेंडूंतील विक्रमी आणि धडाकेबाज शतकाच्या जोरावर टी-20 वर्ल्ड कपची प्रथमच अंतिम फेरी गाठली. त्यांनी अपराजित असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा अक्षरशः धुव्वा उडवत 170 धावांचे लक्ष्य 41 चेंडू आणि नऊ विकेट राखून सहजगत्या पार केले.

आज रंगपंचमीच्या दिवशी फिन ऍलनने विक्रमी धुळवड करताना वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात वेगवान शतकाची नोंद करत ख्रिस गेलचा 47 चेंडूंतील शतकाला 14 चेंडू आधीच मागे टाकले. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कसोटी दर्जा असलेल्या संघांमधील सर्वात वेगवान शतकाचाही विक्रम याच खेळीच्या नावावर लागला. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेगवान शतक साहिल चौहानच्या 27 चेंडूच्या नावावर अद्याप आहे. ऍलनने आपल्या या खेळीत 10 चौकारांसह 8 षटकारही खेचले. त्याने 19 चेंडूंत पन्नाशी तर पुढच्या 14 चेंडूंत आणखी 50 धावा चोपल्या. तसेच टीम सायफर्टच्या (58) साथीने 117 तर रचिन रवींद्रसह 56 धावांची अभेद्य भागीही ऍलनने केली. मार्को यान्सनच्या गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवताना 2.5 षटकांत 53 धावा चोपून काढल्या.

स्पिनच्या जाळय़ात अडकला आफ्रिका

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅण्टनरच्या नेतृत्वाखाली किवी गोलंदाजांनी विशेषतः फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला लगाम घातला. फिरकीवीर कोल मकोन्ची आणि रचिन रवींद्रच्या फिरकीने  आफ्रिकन फलंदाजांच्या नाकात दोरी टाकत त्यांच्या फटकेबाजीवर बंधने लादली. परिणामतः हा संघ 169 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. मार्को यान्सनच्या 30 चेंडूंतील 55 धावांच्या घणाघातामुळे आफ्रिकन संघ 169 धावांपर्यंत पोहोचला.