थकबाकीदार 169 गाळेधारकांना जप्ती नोटीस, अहिल्यानगर मनपाची कारवाई सुरू; 15 मार्चची डेडलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांसंदर्भात कठोर कारवाई सुरू केली आहे. मार्केट विभागाने शहरातील विविध शॉपिंग सेंटर्समधील 169 गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. भाडय़ाची मोठी थकबाकी आणि मूळ गाळ्यांमध्ये केलेले अनधिकृत बदल यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. येत्या 15 मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास गाळे जप्त करून त्यांचे फेरलिलाव करण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

महापालिकेने शहरातील सर्व खुल्या जागा, व्यापारी संकुलांमधील गाळे, ओटे आणि शाळांच्या वर्गखोल्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अनेक गाळेधारकांनी महापालिकेची परवानगी न घेता मूळ गाळ्यांमध्ये बेकायदेशीर बदल केल्याचे आढळले आहे. दोन किंवा अधिक गाळे एकत्र करणे, स्लॅब फोडून अनधिकृत जिना काढणे, पुढील जागेचा हॉटेल व्यवसायासाठी बंदिस्त वापर करणे, गाळ्यांमध्ये वाढीव बांधकाम करणे, टी-अँगल टाकून तळमजला व पहिल्या मजल्यावर बांधकाम करणे अशा व इतर स्वरूपाचे बेकायदेशीर व विनापरवाना बदल करण्यात आले आहेत.

तसेच 169 गाळेधारकांपैकी अनेकांकडे महापालिकेची सन 2025-26 अखेरची एकूण थकबाकी सुमारे 4 कोटी 32 लाख रुपयांच्या घरात आहे. अनेक गाळेधारकांकडे लाखोंची थकबाकी प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेने रंगभवन
शॉपिंग सेंटर, सावित्रीबाई फुले शॉपिंग सेंटर (फेज-1 व 2), प्रोफेसर शॉपिंग सेंटर, गंगा उद्यान शॉपिंग सेंटर, वाडिया पार्क शॉपिंग सेंटर, माळीवाडा शॉपिंग सेंटर, संत कैकाडी महाराज शॉपिंग सेंटर, जुना दाणे डबरा (खुली जागा आणि शॉपिंग सेंटर), ग्राहक भांडार (पश्चिम बाजू), सिद्धार्थनगर शॉपिंग सेंटर, अमरधाम शॉपिंग सेंटर आणि कंपाउंडलगतची जागा, जनरल पोस्ट शॉपिंग सेंटर, खजूरगल्ली शॉपिंग सेंटर, छाया टॉकीज शॉपिंग सेंटर आदी संकुलातील गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

थकबाकीदार गाळेधारकांनी 15 मार्चपूर्वी थकबाकी भरावी, फेरबदल करणाऱयांनीही त्यांना आकारलेल्या दंडाची रक्कम भरावी; अन्यथा सदरचे गाळे जप्त करण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. जप्ती कारवाईनंतर या गाळ्यांचे तत्काळ लिलाव करण्यात येतील, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.